‘वेदांता’ स्थलांतरीत होण्यास महाविकास आघाडी जबाबदार: माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा आरोप | पुढारी

‘वेदांता’ स्थलांतरीत होण्यास महाविकास आघाडी जबाबदार: माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा आरोप

वडगाव मावळ : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरीत होण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार सर्वस्वी जबाबदार असून आता त्याच महाविकास आघाडीचे नेते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी मंत्री संजय भेगडे यांनी केला.
महाविकास सरकार वेदांता फॉस्ककॉन प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याचा निषेधार्थ आज भाजप, शिवसेना (शिंदे गट), आरपीआय महायुतीच्या वतीने वडगाव मावळ येथे मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले, या वेळी झालेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जमीन संपादित केल्याचे पुरावे द्या
या प्रकल्पासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती, हा प्रकल्प तळेगाव एमआयडीसी येथे होण्यासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारसोबत झालेल्या कराराची प्रत मिळावी. तसेच, त्यांनी या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली होती का? असेल तर जमीन संपादित केलेला शासन आदेश मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी
आमदार राम कदम म्हणाले, वेदांता फॉक्सकॉनकडे महाविकास आघाडीने किती कोटीची खंडणी मागितली याची माहिती आदित्य ठाकरे यांनी द्यावी. तसेच, थोडी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी जनतेची वडगाव मावळ येथे पुन्हा येऊन माफी मागावी अन्यथा प्रशासनाकडून मिळालेला उत्तराचा कागद आम्ही महाराष्ट्रातील गावागावात जाऊन तुमची फसवेगिरी उघड करू.

राम कदम यांची 1 कोटीच्या बक्षिसाची खुली ऑफर
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत फक्त पाच वेळा मंत्रालयात गेले, ते सहाव्यांदा गेले असल्याचे पुरावे द्या व 1 कोटीचे बक्षीस मिळावा, अशी ऑफर राम कदम यांनी या वेळी दिली. जे कधी मंत्रालयात गेलेचे नाहीत. ज्यांनी कंपनीसोबत कुठलाच करार केला नाही ते प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची ओरड करत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Back to top button