पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: बनावट नकाशा दाखवून महिलेला फ्लॅटची विक्री केली. याबाबत महिलेने जाब विचारला असता तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 24 एप्रिल ते 25 सप्टेंबर या कालावधीत बावधन खुर्द येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुहास लुंकड, मिलिंद लुंकड, संजय लुंकड, दीपक भटेवारा, मयूर पाटील, राजीव गंभीर, प्रशांत गाढवे, विजय मुरकुटे, सुपरवायजर काळे, दोन महिला आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना फसविण्यासाठी बनावट नकाशा केला. खोटा नकाशा अॅग्रीमेंटमध्ये देऊन फिर्यादी यांची एक कोटी तीन लाख 14 हजार 445 रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी याबाबत जाब विचारला असता सुपरवायजर काळे आणि एका अनोळखी पेंटरने त्यांना धमकी देऊन विनयभंग केला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
जमीन विक्रीच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक
जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाची 35 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल 2021 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत भारत माता नगर, दिघी आणि न्यू गवळी कॉम्प्लेक्स, आळंदी रोड कॉर्नर, भोसरी येथे घडला. अंबाजी विठोबा चव्हाण (52, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजाराम लक्ष्मण ढमाले (58, रा. दिघी), शब्बीर इब्राहिम पटेल (55, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना साडेतीन गुंठे जमीन नावावर करून देतो असे सांगितले. दरम्यान, विसार पावती करारनामा करून फिर्यादी यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले. त्यानंतर जमीन नावावर करून न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
मुलगी गरोदर राहिल्यानंतर बालविवाहप्रकरणी गुन्हा
अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर पतीसह पाच जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 ऑक्टोबर 2021 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत सांगली आणि चाकण येथे घडला. याप्रकरणी महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती (वय 22), त्याचे आई, वडील आणि पीडित मुलीचे आई वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपींनी आपसात संगनमत करून तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पतीने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.