नाशिकमध्ये नितीन गडकरी, आदित्य ठाकरेंच्या आज सभा, योगी आदित्यनाथ उद्या मालेगावी

नाशिकमध्ये नितीन गडकरी, आदित्य ठाकरेंच्या आज सभा, योगी आदित्यनाथ उद्या मालेगावी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची शुक्रवारी (दि.१७) सभा होत आहे. तर, धुळे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा शनिवारी (दि.१८) होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या 'प्रचारवॉर' सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. नाशिक मतदारसंघात आतापर्यंत महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, आदी नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उध्दव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत, आदी नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी(दि.१७) सायंकाळी ५.३० वाजता गोदाघाटावरील भाजीबाजार पटांगणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती या सभेला असणार आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सभा याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पवननगर मैदानावर होत आहे. या सभेनंतर सिन्नर येथील सभेस आदित्य ठाकरे संबोधणार आहेत. शनिवारी(दि.१८) दुपारी १२ वाजता मालेगाव कॅम्प येथील पोलिस परेड ग्राऊंडवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. या सभांकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news