

पुढारी ऑनलाइन डेस्क | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. नागपूरातील अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशिकमध्ये आले असून येथे आपली भूमिका ते जाहीर करणार आहेत. यासंदर्भात विचारले असता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मात्र भुजबळांवर टीका केली आहे. भुजबळांवर टीका करतानाच त्यांना मंत्रिपदापासून का दूर ठेवण्यात आलं याचं कारणही कांदे यांनी सांगितलं आहे.
कांदे आणि भुजबळ यांचे वैर अवघ्या महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहे. विधानसभेतही महायुतीतील घटक पक्ष असतानाही पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी चा राजीनामा देऊन कांदे यांच्याविरोधात नांदगावमधून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळेला भुजबळ-कांदे यांच्यात चांगलाच वाद झाला. नांदगावातून समीर भुजबळ हे पराभूत झाले, मात्र येवल्यातून छगन भुजबळ निवडून आले. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच नाराज असलेल्या भुजबळांना कांद्यानी आणखी डिवचले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना कांदे यांनी भुजबळांना मंत्रिपद का दिलं गेलं नाही हे सांगतानाच राजीनामा देऊन दाखवा असे ऑपन चॅलेंज केलं आहे.
मला भुजबळांची कीव येते. त्यांनीही आता कितीही ढोंगीपणा केला तरी त्यांच्यात पक्ष सोडण्याची हिंमत नाही. भुजबळ हे खरच ऑरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी राजीनामा देऊनच दाखवावा असे आव्हान सुहास कांदे यांनी भुजबळांना केलं आहे.
कांदे म्हणाले, मी एकदा छगन भुजबळ साहेबांना बोललो होतो की, साहेब तुम्ही दिसायला सुंदर असता तर तुम्ही चांगले अभिनेते झाले असते. पण दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाहीत म्हणून ते अॅक्टर झाले नाहीत. फक्त एकटे भुजबळ म्हणजे ओबीसी समाज होत नाही. फक्त भुजबळांना मंत्रिपद दिलं म्हणजे ते ओबीसींना दिलं असं होत नाही. एका बाजूला मुलाला द्यायचं, दुसऱ्या बाजुला पुतण्याला द्यायचं. भुजबळांच्या विरोधात तक्रार करणारा पहिला आमदार सुहास कांदे आहे. भुजबळांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळेला महायुती धर्म पाळला नाही. दिंडोरी व नाशिक मध्ये त्यांनी काम केलं नाही. त्याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिले आणि म्हणूनच भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही असे कारण सुहास कांदे यांनी सांगितले आहे.