

येवला : 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती, तर मी नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांनी, तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत अशी गळ घातली होती असा गौप्यस्फोट माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला. तसेच राष्ट्रवादी स्थापनेला प्रारंभी आपण एकटेच शरद पवारांसोबत होतो अशी आठवणही करून दिली. भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात समर्थकांशी संवाद साधला.
भुजबळ म्हणाले, ज्यांनी आपले काम नाही केले, त्यांचे काम आपण करू या. सर्वांना बरोबर घेऊन चालायचे आहे. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. अडचणीच्या काळातदेखील विरोधकांना मदत करणार असून कोणाविषयी शत्रुत्व नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबाबत बोलताना, मला मंत्रिपद न दिल्यामुळे काही लोकांना अजित पवारांनी धन्यवाद दिले आहेत. मात्र, मला मंत्रिपदे अनेकदा मिळाली. त्यामुळे आता मंत्री झालो नाही. याचे कुठलेही वाईट वाटत नसल्याचे सांगले. तसेच आता मंत्रिपदासाठी पक्षांमध्ये भांडणे सुरू असल्याचा टोलाही लगावला.
ज्या काळात मुंबईमध्ये गुन्हेगारांची दहशत होती, तेव्हा मी गृहमंत्री होते. अभिताभ बच्चन, शाहरूख खान हे मुंबई सोडून जाणार होते. मात्र, मी त्यांना थांबवले तसेच मुंबईमधील दहशत संपवली. दाऊदचे नाव घ्यायला लोक घाबरायचे त्यावेळी आपण लढलो. त्यामुळे लढायला आपण घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.