

नाशिक : 'मी भुजबळ आहे, कुणाच्या हातातील खेळणे नाही. आता वाट पाहणार नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षनेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तसे झाले नाही, असा गौप्यस्फोट करत, मंत्रिपद कुणी नाकारले ते शोधावे लागेल. तीनही गटांचे नेते निर्णय घेत असतात. आमच्या गटाचे नेते अजित पवार त्यांचा निर्णय घेतात, असा सूचक अंगुलीनिर्देश करत प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण माझी अवहेलना केली गेली, अशी संतप्त भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. बुधवारी (दि.१८) राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगत भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदावरून डावलले गेल्याने नाराज झालेल्या भुजबळांनी मंगळवारी (दि.१७) नाशिक व येवल्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भुजबळ म्हणाले की, मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कार्यकर्ते दु:खी व निराश आहेत. सगळ्यांच्या मनात मला मंत्रिपदावरून डावलल्याचा राग आहे. मला मंत्रिपद कुणी नाकारले ते शोधावे लागेल. तीनही गटांचे नेते आपापल्या पक्षातील मंत्रिपदाबाबत निर्णय घेत असतात. आमच्या गटाचे नेते अजित पवार त्यांचा निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण माझी अवहेलना केली गेली, त्याचे दु:ख आहे. उमेदवारी देताना मला वाट पाहावी लागली. मी लोकसभा, राज्यसभा मागितली होती, पण तीदेखील मिळाली नाही. मला लोकसभेत जाण्याची इच्छा होती. मोदी -शाह यांनीदेखील माझे नाव सुचवले होते. पण निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर महिना उलटला तरी माझे नाव जाहीर झाले नाही. हे सगळ मी सहन केले. त्यानंतर राज्यसभेची जागा आली, मी म्हटले मला जाऊ द्या, ते म्हणाले सुनेत्राताईंना पाठवणार, मी काही नाही बोललो. दुसरी पीयुष गोयल यांची जागा नितीन पाटील यांना देण्यात आली. तुम्ही राज्यात आवश्यक आहेत, असे सांगितले गेले. आता अचानक पुन्हा राज्यसभेची ऑफर दिली. मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मी जनतेचा निरोप घेऊन येणार सांगितले. मी काही हातातले खेळणे नाही, असे म्हणत त्यांनी थेट पक्षप्रमुख अजित पवार यांना टोला लगावला.
माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते, असा गौप्स्फोट भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे समीर भुजबळ यांच्याशी बोलत असल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले. बसून चर्चा करू असे मला अजित पवारांकडून सांगण्यात आले. परंतु, कधी बसलेच नाही असे सांगत, अजित पवार यांच्याशी माझा संपर्क झालेला नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बुधवारी (दि.१८) राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भुजबळ यांची नाराजी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.