धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका; 77 लाखांचा ऐवज जप्त

धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका; 77 लाखांचा ऐवज जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्ग लगत जुने वाहन तोडणाऱ्या केंद्रांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 77 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वीस दुकान मालकांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्क्रॅपच्या नावाखाली वाहन तोडीचा काळाबाजार धुळ्यात सुरू असल्याची बाब पोलीस कारवाई मधून पुन्हा एकदा उघड झाली असून प्रादेशिक परिवहन विभाग करतो काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

मुंबई आग्रा महामार्ग लगत वाहन तोडीचा काळाबाजार अवैधपणे सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गातील लगत असलेल्या या संबंधित केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात सुमारे वीस दुकानांच्या परिसरामध्ये अर्धवट तोडलेल्या चार चाकी वाहनांचे सुटे भाग आढळून आले. या भागांमध्ये चेसीस सह भंगार साहित्य आढळून आले. या पथकाने संबंधित दुकान मालकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे स्क्रॅप करण्याचे अधिकृत कागदपत्र आढळून आले नाही. त्याचप्रमाणे या दुकान मालकांनी समाधानकारक खुलासाही केला नाही. त्यामुळे घटनास्थळावरून सुमारे 77 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून वीस दुकान मालकांविरोधात भादवी कलम 379 ,411 ,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून महामार्गालगत वाहन तोडीचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

यापूर्वी देखील कारवाई

काही वर्षांपूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी धुळे येथे येऊन ट्रक तोडीचे रॅकेट उघडकीस आणले होते. येथून काही आरोपींना देखील अटक करून औरंगाबाद येथील दाखल गुन्ह्यात कारवाई करण्यात आली होती. त्या पाठोपाठ ट्रक चोरीच्या ट्रकचे रॅकेट देखील धुळे पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेट अंतर्गत ट्रकच्या इंजिन आणि चेसीजवर बनावट नंबर ठोकण्यात आलेले बाब तपासात उघडकीस आली. त्यावेळी महामार्गालगत ट्रक तोडण्याचा काळाबाजार ऐरणीवर आला होता. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील आरटीओ विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र आज पुन्हा धुळे पोलिसांनी या ट्रक तोडण्याच्या रॅकेट चालवणाऱ्यांना कारवाई मधून तडाखा दिला आहे. यातून प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news