

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
घरखर्च व मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या पैशांवर तब्बल ३० टक्के मासिक व्याज आकारून, आतापर्यंत चार लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी ४ लाख २२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मुलांना व कुटुंबाला त्रास देण्याची धमकी, मारहाण व शिवीगाळ केल्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात कांचन जाधव व तिच्यासोबतच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महिलेने घरखर्च व मुलांच्या शिक्षणासाठी आरोपींकडून सुरुवातीला १० हजार रुपये घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण ८० हजार रुपये ३० टक्के मासिक व्याजाने घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घेतलेल्या रक्कमेपोटी एप्रिल २०२६ पर्यंत थोडी - थोडी रक्कम करून एकूण चार लाख रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आरोपींनी फिर्यादी महिलेला त्यांच्याकडे अद्याप ४ लाख २२ हजार रुपये देणे असल्याचे सांगितले. ही रक्कम न दिल्यास तुला व तुझ्या मुलीला सचिन नावाच्या व्यक्तीकडे धंद्यावर बसवू तसेच तुझ्याकडून पैसे वसूल करू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतरही आरोपींकडून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून मोरे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
जिवे मारण्याची धमकी:
शनिवारी (दि. २६) जाधव तिच्यासह सोबतच्या व्यक्तीने फिर्यादी महिलेला मारहाण केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख आणून आणि उर्वरित ३ लाख २२ हजार रुपयांचा हातउसना बाँड करून देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.