

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत (स्टाइस) येथील उद्योजकांना गेल्या सहा-सात महिन्यांपासून भेडसावणाऱ्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
या वेळी उद्योजकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करण्याची घोषणा केली.
बैठकीस महावितरणचे नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, सिन्नर-१ चे उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड, मुसळगाव सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता वैभव थोरे उपस्थित होते. उद्योजकांनी वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा, रोहित्रांच्या पेट्या व फ्युजची दुरवस्था, झोळ पडलेल्या वीजवाहिन्या, रस्ता क्रॉसिंगवरील कमी उंचीच्या पोलसह विविध तांत्रिक अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. संस्थेच्या वतीने लेखी निवेदन देत समस्यांचे छायाचित्रे व सादरीकरणही दाखवण्यात आले.
महावितरण अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारींची नोंद घेत प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. नवीन १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि आवश्यक तांत्रिक सुधारणांमुळे स्टाइमधील वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संस्थेचे चेअरमन अरुण चव्हाणके, व्हॉ. चेअरमन प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. संचालक अतुल अग्रवाल, रामदास डापसे, अविनाश तांबे, पंडित लोंढे, बाबासाहेब दळवी, संचालिका सुधा माळोदे, स्वीकृत संचालक कैलास वाकचौरे यांच्यासह अनिल आसावा, ओमप्रकाश शिरापुरे, दत्तात्रय सानप, भगतसिंग राजपूत, मोहनराज सोनवणे तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारंवार वीज जाण्यामुळे प्लास्टिक, रबर, केमिकल्स व फार्मास्युटिकल्स उद्योगांमध्ये मशिनरीत कच्चा व पक्का माल अडकून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक मशिनरीचे प्रोग्रामिंग व संगणकीय डेटा करप्ट होण्याची समस्याही मांडण्यात आली. पावसाळ्यातील ट्रिपिंग रोखण्यासाठी झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि आवश्यक देखभाल साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी उंच पोल आणि एरियल बंच कंडक्टर बसविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
स्टाइसमधील ३६७ हून अधिक उद्योग घटक दरमहा सरासरी १० ते ११ कोटी रुपयांचे वीजबिल भरतात. त्यामुळे वीजपुरवठ्यातील वारंवार व्यत्ययाचा थेट परिणाम उत्पादनावर आणि उद्योगांच्या आर्थिक व्यवहारांवर होत होता. महावितरणच्या सकारात्मक भूमिकेमुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.