

सटाणा : सुरेश बच्छाव
बागलाण तालुक्यातील आराईसह परिसरातील विविध शिवारांत विचित्र प्राणी आढळल्याच्या अफवांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर छायाचित्रे व व्हिडिओंसह या अफवेचा अक्षरशः बाजार मांडला गेल्याने विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अफवांचा थेट फटका शेती व्यवसायाला बसत असून, बाहेरगावाहून आलेले शेतमजूर काम अर्धवट सोडून गावाकडे परतू लागले आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात मेसेज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात हे छायाचित्र व व्हिडिओ गुगलवरून डाउनलोड केलेले असून, अमेरिकेतील जुन्या घटनेशी संबंधित आहेत.
एलियनचा पेहराव करून मित्रांची मस्करी करण्यात आलेल्या त्या घटनेचे फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध असून, तेच काही तरुणांनी भारतातील बिकानेर परिसरात 'विचित्र प्राणी' म्हणून व्हायरल केले. ही अफवा पुढे महाराष्ट्रात पोहोचत बागलाण तालुक्यातील आराई परिसरात त्या प्राण्याचे दर्शन झाल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आल्या.
अफवांमध्ये हा प्राणी प्रामुख्याने महिलांवर हल्ला करतो, नरडीला चावा घेऊन रक्त पितो अशा अतिरंजित आणि भीतीदायक गोष्टी सांगितल्या जात आहेत. काही महिलांवर हल्ले होऊन त्या जखमी झाल्याचाही दावा करण्यात येतो.
मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत अशी एकही घटना घडलेली नसून कोणतीही जखमी महिला समोर आलेली नाही. तरीदेखील खात्री न करता संदेश फॉरवर्ड करण्याच्या सवयीमुळे या अफवांनी गावोगावी जोर धरला आहे. एकाच मजकुरात केवळ गावाचे नाव बदलून तोच मेसेज वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप गटांवर व्हायरल केला जात आहे.
परिणामी, अनेक गावांमध्ये घबराट पसरली असून काही ठिकाणी युवकांनी शेकडोंच्या संख्येने रात्रभर पहारा देण्यास सुरुवात केली आहे. या दहशतीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
बाहेरगावाहून आलेले शेतमजूर शिवारात उघड्यावर वास्तव्य करून काम करीत असतात. मात्र, अफवांमुळे जीविताला धोका असल्याच्या भीतीने हे मजूर आपापल्या गावांकडे परतू लागले आहेत. त्यामुळे शेतमजुरांची टंचाई निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
पोलिसांचा खुलासा; कारवाईचा इशारा
आराई परिसरात विचित्र प्राणी आढळल्याची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. शनिवारी रात्री पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन संपूर्ण शिवाराची पाहणी केली. मात्र, असा कोणताही प्राणी आढळला नाही. २०२० सालातील जुने फोटो व व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे. असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले.
पत्थरभुल्याची आठवण ताजी
सुमारे दोन ते अडीच दशकांपूर्वी बागलाण तालुक्यात 'पत्थरभुल्या' नावाच्या काल्पनिक प्राण्याची अशीच अफवा पसरली होती. त्यावेळी गावोगावी युवकांनी आळीपाळीने पहारे दिले होते. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
आराई परिसरात पसरलेल्या शेतमजूर काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत. याचा परिणाम शेती कामांवर होत आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत.
- नयन सोनवणे, भाजयूमो बागलाण