Rupali Chakankar ED Summons | मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स; 14 मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Rupali Chakankar ED Summons | भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
Rupali Chakankar News
Rupali Chakankar Newspudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. विशेष तपास पथकाच्या तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना १४ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Rupali Chakankar News
Jal Jeevan Mission | मनखेडमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण; हंडा मोर्चाचा इशारा

समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसेच अशोक खरातशी संबंधित संस्थांमधील सहभाग या मुद्द्यांवर ईडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये १० मे रोजी एसआयटीने रूपाली चाकणकर यांची सुमारे सहा तास चौकशी केली होती. त्या चौकशीला अवघे तीन दिवस उलटत नाहीत तोच ईडीचे समन्स बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर व त्यांचा मुलगा तन्मय यांची या अगोदरच चौकशी झाली आहे. अशोक खरातच्या शिवलिका संस्थेमध्ये रूपाली चाकणकर या विश्वस्त पदावर कार्यरत होत्या. तसेच त्यांचा खरातशी सातत्याने संपर्क असल्याचे एसआयटी तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित धागेदोरे मिळाल्याचेही समजते. तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहार, संस्थांच्या बैठका, विविध कार्यक्रमांमधील सहभाग तसेच शिफारशींची माहिती तपासली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना अशोक खरातशी संबंधित तक्रारींमध्ये पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून त्याला मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

त्यामुळे ईडीकडून या सर्व बाबींवर सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. समता पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांबाबतही तपास यंत्रणा कागदपत्रांची पडताळणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात यापूर्वी रूपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही चौकशी करण्यात आली होती.

Rupali Chakankar News
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

अशोक खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

भोंदू अशोक खरातविरोधात सध्या एकूण १६ गुन्हे दाखल असून, आर्थिक गैरव्यवहार, महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण आणि विविध आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे. आता एसआयटीनंतर ईडीची चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला आणखी वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news