

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पालकांनी निर्बंध घातल्यामुळे तणावात असलेल्या १४ वर्षीय मैत्रिणीला बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फूस लावून घरातून १५ लाख रुपयांचे दागिने चोरण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार तिसवाडीमध्ये घडला आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी दागिने विकण्यास मदत करणाऱ्या रफिक शेख याला अटक केली असून, पीडितेसह तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीची 'अपना घरात' रवानगी केली आहे.
हा प्रकार १ मे २०२६ पूर्वी घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी रफिक शेख (रा. पणजी) याला अटक केली आहे. 'अपना घरात' रवानगी केलेली १४ वर्षीय पीडित मुलगी ही कुंभारजुवे मतदारसंघातील असून १७ वर्षीय संशयित मुलगी ही सांतआंद्रे मतदारसंघातील आहे. पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये नापास झाली होती. त्यामुळे तिच्यावर पालकांनी काही निर्बंध घातले होते आणि या निर्बंधांमुळे ती तणावाखाली होती.
आपली मैत्रीण अस्वस्थ असल्याची कल्पना तिच्या १७ वर्षीय संशयित मैत्रिणीला आली. त्यानंतर संशयित मुलीने इन्स्टाग्रामवर 'रोहीत' नावाच्या व्यक्तीच्या नावे बनावट अकाऊंट उघडले आणि पीडितेशी संपर्क साधला. शांती हवी असल्यास आपल्याला एक मंत्रपाठ करणारा बाबा माहीत आहे, त्याच्याकडे जायचे असल्यास पैसे लागतील, असे सांगून संशयित मैत्रिणीने तिला घरातून दागिने चोरण्यास प्रवृत्त केले.
पीडित मुलीने घरातील काही दागिने संशयित मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर आणून दिले. तेव्हा ती इन्स्टाग्राम अकाऊंटधारक आपली मैत्रीणच असल्याचे तिला समजले. नंतर संशयित मुलीने रफिक शेख याच्यामार्फत ते दागिने विकले. यातील काही हिस्सा त्यांनी पीडितेलाही दिला होता. हल्लीच पीडित १४ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. तसेच घरातील १५ लाखांचे दागिने देखील गायब झाले होते. मुलगीच दागिने घेऊन पळाल्याचा संशय आल्याने पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार जुने गोवे पोलिसांत दिली. पोलिसांना पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी सापडली. पोलिसांनी दोघींचीही चौकशी केली, तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला.
सत्य की संगनमत?
संशयित रफिक शेख हा जमीन विक्री व्यवहारातील ब्रोकर असून आपली मालमत्ता विकण्याच्या व्यवहारातून त्याच्याशी ओळख झाली होती आणि त्याच्याच मदतीने मैत्रिणीचे दागिने विकले, असे संशयित मुलीने सांगितले. मात्र, ही मुलगी सत्य सांगत आहे की, संशयितासोबत संगनमताने तिने मैत्रिणीला लुबाडण्याचा कट रचला होता, याबाबतची सविस्तर चौकशी पोलिस करीत आहेत.