

पुढारी विशेष / अंजलि राऊत, प्रतिनिधी
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक जीवन आणि पत्रकारितेतील घडामोडींवर आपल्या कुंचल्यातून मार्मिक भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' आजही व्यवस्था प्रश्न विचारत उभा आहे. चौकटीचा कोट, चष्मा आणि चेहऱ्यावरील बोलके मौन अशा वैशिष्ट्यांतून सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करण्याच्या व्यक्तिरेखेने दशकानुदशके देशातील परिस्थितीचा आरसा दाखवला.
२४ ऑक्टोबर रोजी आर. के. लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यंगचित्रांची आठवण होत असताना नाशिकमधील ज्येष्ठ आणि तरुण व्यंगचित्रकार सोशल मीडिया, प्रदर्शने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून ही कला जीवंत ठेवत आहेत. मात्र, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तो व्यवस्थेच्या केंद्रस्थानी केव्हा येणार, हा लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'ने उपस्थित केलेला प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगचित्रातून सर्वसामान्य भारतीयाच्या मनातील प्रश्न, अस्वस्थता आणि अपेक्षा प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या 'कॉमन मॅन'ने कोणत्याही मोठ्या भाषणाशिवाय व्यवस्थेतील विसंगतीवर भाष्य केले. पूर्वीच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर व्यंगचित्राला स्थान असायचे.
आज नाशिकमधील सामान्य नागरिक खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अनियमित पाणीपुरवठा, वाढती महागाई आणि नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींनी त्रस्त आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व्यंगचित्र हे प्रभावी माध्यम ठरू शकत असतानाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता सतावत असल्याने व्यंगचित्रकार ते मांडण्यास सहजासहजत नाहीत.
व्यंगचित्र म्हणजे केवळ चेहऱ्याची अतिशोक्ती नव्हे, व्यक्तीचे वैशिष्ट्य टिपणे, सामाजिक संदर्भ समजून घेणे, योग्य प्रसंग निवडणे आणि काही रेषांतून आशय पोहोचवण्यासाठी निरीक्षणशक्ती, अनुभव आणि संवेदनशीलता आवश्यक असते. हाताने कागदवर उमटणाऱ्या रेषेमधील सहजता आणि कलाकाराची स्वतंत्र शैली ही या कलेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे एआयचा वापर करताना कलाकारांचे हक्क, त्यांच्या कलाकृतीची परवानगी आणि योग्य मोबदला यांचाही विचार होणे गरजेचे आहे.
व्यंगचित्रासाठी नियमित मानधन, व्यावसायिक संधी आणि कलाकारांच्या कामाचे योग्य मूल्य उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थानिक पातळीवर प्रदर्शनांना प्रोत्साहन, वृत्तपत्रांमधील संधी, कार्यशाळा आणि संस्थात्मक सहकार्य वाढवल्यास नवोदित कलाकारांनाही या क्षेत्रात टिकून राहण्यास मदत होईल.
आर. के. लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या 'कॉमन मॅन'ची आठवण करताना व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्जनशील स्वातंत्र्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान बदलतील, माध्यम बदलतील; मात्र सामान्य माणसाचे प्रश्न जोपर्यंत कायम आहेत, तोपर्यंत त्यांना वाचा फोडणाऱ्या व्यंगचित्राची गरजही कायम राहील.
सामान्य माणसाला आजही मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रश्न विचारावे लागत आहेत. त्याच्या प्रश्नांना शब्द देण्याचे काम वास्तव्याचे मर्म काही मोजक्या रेखांतून व्यंगचित्रकार मांडतो. त्यामुळे व्यंगचित्रकला ही केवळ मनोरंजनाची कला नसून जनभावना व्यक्त करणारे आणि व्यवस्था आत्मपरीक्षणास भाग पाडणारे माध्यम आहे.
'सामान्यांना न्याय देण्यासाठी सामान्य व्यक्ती व्यवस्थेच्या केंद्रस्थानी केव्हा येणार,' असा प्रश्न लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेला 'कॉमन मॅन' आजही विचारत आहे, असे मत व्यंगचित्रकार संजय दुर्गवाड यांनी व्यक्त केले.
नाशिकसारख्या शहरात या कलेला मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्लीइतके मानधन मिळत नाही, पण हीच कला आपल्या येथे रुजावी, वाढावी, या संकल्पनेतून आपण सराव करत असल्याचे त्यांनी सांगितले. थोर व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला 'कॉमन मॅन' धोतर आणि कोटातील होता. तो सर्वसामान्यांचे विचार आणि त्यांच्या समस्या मांडत होता. वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारची व्यंगचित्रे कमी प्रमाणात दिसत असली, तरी फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया माध्यमांमुळे या कलेला एक नवी आणि चांगली दिशा मिळाली आहे.
कार्टूनिस्ट्स कम्बाइन संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०२६ चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ येथे करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये दि. २५ ते २७ पर्यंत होणारे हे तीन दिवसीय संमेलन पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले असून यामध्ये व्यंगचित्र कार्यशाळा, देशभरातून मराठी व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके, परिसंवाद, व्यंगचित्र प्रदर्शनी आणि पुरस्कार सोहळा पार पडणार आहेत.