चैत्राम पवार यांना पी.के.अण्णा फाउंडेशनचा पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

चैत्राम पवार यांना पी.के.अण्णा फाउंडेशनचा पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

पिंपळनेर, ता.साक्री : पुढारी वृत्तसेवा, पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावर्षी संस्था स्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पुणे व व्यक्ती स्तरावर आदर्शगाव बारीपाडा येथील आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त चैत्राम देवचंद पवार यांना घोषित करण्यात आला आहे.

 संबधित बातम्या

सहकार महर्षी पी.के.अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व मानचिन्ह असे आहे. यावर्षी 9 ऑक्टोबर रोजी संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत पुणे या दुष्काळ निवारण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस देण्यात येणार आहे. संस्थेमार्फत ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प, विकलांग कल्याण, पढो परदेश योजना, जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलस्रोत विकास आदी क्षेत्रात कार्य करण्यात येते.

व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार आदर्शगाव बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त चैत्राम देवचंद पवार यांना दिला जाणार आहे. चैत्राम पवार यांनी 1992 पासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून ग्राम विकासाची लोकचळवळ उभी केली आहे. या अंतर्गत गावात चराईबंदी, कुन्हाड बंदी व दारुबंदी याचे उल्लंघन केल्यास दंड वसूल करण्यात येतो. सद्य:स्थितीत गावाच्या शेजारील वन जमिनीवर लोकसहभागातून वनसंवर्धन केले जात आहे. श्रमदानातून दगडी बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. बारीपाड्यातून परिसरातील काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, जलसाक्षरता, शिक्षण, आरोग्य, तसेच 19 वर्षांपासून सुरू असलेली वनभाजी स्पर्धा आदींबाबत जनजागृतीचे उपक्रम चैत्राम पवार लोकचळवळीतून बारीपाड्यात राबवत आहेत. त्यामुळे गावाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. देश-विदेशातील विविध पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांना श्रमदान व लोकचळवळीतून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news