Nashik Sex Ratio Decline | नाशिकमध्ये 'मुलगाच हवा' मानसिकतेला आळा कधी? दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण अवघ्या 884 वर

Nashik Sex Ratio Decline | मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला; हजार मुलांमागे केवळ 884 मुली
Nashik Sex Ratio Decline
Nashik Sex Ratio Decline
Published on: 
Updated on: 

नाशिक : आसिफ सय्यद

चंद्रावर आणि मंगळावर मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या समाजात मुलगा-मुलगी भेदाची मानसिकता अद्याप कायम असल्याचे धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये समोर आले आहे. शहरातील मुलींचा जन्मदर सातत्याने घसरत असून, जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत दर हजार मुलांमागे केवळ ८८४ मुलींचा जन्म झाला आहे.

Nashik Sex Ratio Decline
Nashik Ganesh Visarjan | नाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत कलम 163 लागू; विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी!

२०२३ मध्ये हे प्रमाण ९१४ होते. अवघ्या चार वर्षांत लिंग गुणोत्तरात ३० अंकांची घट झाल्याने शहरातील स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नाशिक महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत ७ हजार ५६७ मुलांचा, तर ६ हजार ६८९ मुलींचा जन्म झाला. म्हणजेच मुलांच्या तुलनेत तब्बल ८७८ मुली कमी जन्मल्या.

या आकडेवारीमुळे गर्भलिंग निदान आणि त्यानंतर होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिक शहरातील जन्माच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लिंग गुणोत्तरात सातत्याने असमतोल दिसून येतो.

२०२३ मध्ये दर हजार मुलांमागे ९१४ मुली जन्मल्या होत्या. २०२४ मध्ये हे प्रमाण थेट ८८७ वर आले. २०२५ मध्ये किंचित सुधारणा होऊन ते ८९४ झाले; मात्र २०२६ मध्ये पुन्हा घसरण होऊन जुलैपर्यंत हे प्रमाण ८८४ वर आले आहे.


तपासण्या होतात; मग कारवाई का नाही?

शहरातील सोनोग्राफी केंद्रांवर नियमित देखरेख ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागावर आहे. दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी विभागीय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. महापालिकेने तपासणीसाठी पथके तयार केल्याचेही सांगितले जाते. मात्र, गेल्या वर्षभरात एकाही सोनोग्राफी केंद्रावर कारवाई झालेली नसल्याची बाब या संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करते.

२०२४ मधील अवैध गर्भपाताने धोकादायक बाजू उघड

२०२४ मध्ये शहरातील महात्मानगर परिसरातील एका रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत गर्भपाताच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेने शहरात अवैध गर्भपाताच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येचा धोका किती गंभीर असू शकतो, हे अधोरेखित केले होते. त्यानंतर सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात केंद्रांवर अधिक प्रभावी नियंत्रण अपेक्षित होते. मात्र, त्यानंतरही मुलींच्या जन्मदरात अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही.

'तपासणी कागदावरच?' या प्रश्नाला बळ

सोनोग्राफी केंद्रांची वर्षातून तीन वेळा तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, तपासणीनंतर गैरप्रकार आढळला नाही, तर त्याची नोंद, तपासणीची व्याप्ती आणि त्यातून झालेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती सार्वजनिक होणेही महत्त्वाचे आहे.

एकीकडे एकाही केंद्रावर कारवाई झालेली नाही, तर दुसरीकडे शहरातील लिंग गुणोत्तर ८८४ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे केवळ तपासण्या झाल्याचे सांगण्यापेक्षा त्यांची परिणामकारकता तपासण्याची वेळ आली आहे.

Nashik Sex Ratio Decline
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

प्रशासन म्हणते, गैरप्रकार नाही!

महापालिकेचे प्रभारी मुख्य आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी केली जात असल्याचे सांगितले. सध्या कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गैरप्रकार आढळल्यास गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची माहिती देण्यासाठी १८००२३३४५७५ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित केंद्राविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीस शासनाकडून एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाते. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news