नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम काेल्हे यांच्यासह शहर व ग्रामीण पोलिस दलातील ५९ पोलिस अधिकारी व कर्मचारीदेखील सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्त पोलिसांचा सहकुटुंब निरोप समारंभ पार पडला.
शुक्रवारी (दि. ३१) विविध शासकीय विभागांमध्ये वयाची पूर्तता करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर हेदेखील पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांनी नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सांभाळताना अवैध धंदे, शस्त्रे बाळगणारे, अवैध गुटखा-मद्य वाहतूक-साठा-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत वचक ठेवला होता. तसेच परिक्षेत्रातील लोकसभा निवडणुकीत राजकीय सभा, रोड शो यांच्याही बंदोबस्ताचे नियोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. कोल्हे हेदेखील पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांनी शहरात पोलिस निरीक्षक ते सहायक आयुक्त पदापर्यंत सेवा बजावली. गंगापूर, पंचवटी, सायबर पोलिस ठाण्यांची धुराही त्यांनी सांभाळली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र कार्यालयात डॉ. शेखर यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. तर शहर पोलिसांनीही पोलिस आयुक्तालयात, ग्रामीण पोलिसांनी पोलिस मुख्यालयात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सेवानिवृत्तांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
शहर पोलिस दलातील नऊ पोलिस उपनिरीक्षक, ११ श्रेणी उपनिरीक्षक, आठ सहायक पोलिस उपनिरीक्षक व तीन हवालदार तसेच एक स्टेनो असे ३२ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर ग्रामीण पोलिस दलातील तीन पोलिस उपनिरीक्षक, १७ सहायक उपनिरीक्षक व सात हवालदार सेवानिवृत्त झाले.
हेही वाचा –