नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यात शिवसेना(शिंदे गट) सत्तेवर असताना आणि महापालिकेवर थेट शासनाचा अंकुश असताना नाशिक महापालिकेत अनागोंदी माजल्याचा आरोप करत शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी महापालिकेचे आयुक्तांवर निशाणा साधला आहे. रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरत असून आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा गंभीर आरोप करत तिदमे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे आयुक्तांविरोधात तक्रार केली आहे.
राज्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे नाशिकवर विशेष लक्ष आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल चार वेळा नाशिकला येत येथील विकासकामांना चालना देण्याचा शब्द उद्योजक, व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नाशिकला दत्तकच घेतले आहे. नाशिकच्या विकासासाठीची कटीबध्दता त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्यक्त केली आहेत. असे असताना शिंदे गटाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी महापालिकेतील कारभाराविरोधात पत्राद्वारे व्यक्त केलेली खदखद लक्षवेधी ठरली आहे. नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी, पथदीप, कचरा व्यवस्थापन, मल-जल वाहिका या मूलभूत सेवा सुविधा देणे महापालिकेचे प्रथम कर्तव्य असल्याचा विसर आयुक्तांना पडला आहे. शहराच्या विकासाबाबत निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही. प्रशासकीय राजवट असल्यामुळे आयुक्तांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधायला हवा. मनपा दवाखाने, हॉस्पिटल, मनपा शाळा, मनपाच्या मालकीच्या इमारती, मागास वस्त्या, झोपडपट्टी, स्लम विभागांची पाहणी करणे अत्यावश्यक आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी आठवड्याला किमान चार ते पाच वेळा फील्ड विजिट करून प्रशासनावर अंकुश ठेवला होता. मात्र आता कोणाचेही लक्ष नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. एमएनजीएलच्या गॅस लाईन टाकण्यासाठी संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. अनेक मलवाहिका, जलवाहिन्या फोडून ठेवल्या आहेत. नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी तक्रार तिदमे यांनी केली आहे.
हेही वाचा –