[author title="चांदवड : सुनील थोरे" image="http://"][/author]
चांदवड(जि. नाशिक) : चांदवड शहरासाठी ओझरखेड धरणावरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियाना अंतर्गत सात दिवस २४ तास स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे कामकाज होऊन एक ते दीड वर्ष लोटले. मात्र, तरीदेखील या योजनेद्वारे शहराला पाच ते सहा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. मोठा दिंडोरा मिरवीत ही योजना सुरू झाल्याचे सांगितले जाते. पण, खऱ्या अर्थाने योजनेचा समस्त चांदवडकरांना फायदा झाला नसल्याने ही योजना कागदावरच असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत असून चांदवडकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.
चांदवड तालुक्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे चांदवड शहरवासीयांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. शहराला पाणी पुरवठा करणारा खोकड तलावही आटला आहे. त्यामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल कोरडे पडले असून पाण्याचे संकट तीव्र झाले आहे. या परिस्थिती उष्णतेने रौद्ररूप धारण केल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, पिण्यासाठी पाणीच नसल्याने प्यायचे काय असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे.
या भीषण दुष्काळी परिस्थितीत शहरासाठी मंजूर करण्यात आलेली ओझरखेड धरणावरील नवीन पाणी पुरवठा योजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा चांदवडकरांना होती. मात्र, या योजनेचे कामकाज होऊनही ही योजना अद्यापही रखडली आहे. या योजनेद्वारा शहराला पाच ते सहा दिवसानंतर पाणी पुरवठा आजतागायत केला जात आहे. जर दुष्काळी परिस्थितीत दररोज पाणी मिळणार नसेल तर या योजनेचा फायदा काय ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शिवाय ही योजना पूर्णत्वास झाल्यावर काही महिन्याच्या आत ही योजना कार्यान्वीत करावयाची होती. त्याकडे मात्र लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याने योजना फक्त आणी फक्त कागदावरच असल्याने या योजनेचा खरच चांदवडकरांना फायदा होईल का अशी शंका व्यक्त होत आहे.
चांदवड शहरासाठी मंजूर केलेल्या योजनेच्या टाकीतून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दररोज ३० ते ३५ टॅंकरने पाणी परवठा केला जात आहे. मात्र, ज्या शहरासाठी ही योजना मंजूर केली आहे, त्या शहराला या योजनेद्वारे ५ ते ६ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असल्याने या योजनेचा नेमका उद्देश शहरासाठी की तालुक्यासाठी या संभ्रमावस्थेत चांदवडकर सापडले आहे.
चांदवड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारा दररोज पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र या योजनेद्वारा अद्यापही २४ तास पाणी पुरवठा केला जात नाही. आज भीषण दुष्काळी परिस्थिती असताना तब्बल ५ ते ६ दिवसांनी नळाला पाणी येत आहे. तसेच या नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी दाबाने येत असल्याने अनेक त्रुटी या योजनेत आहे.
– गुड्डू खैरनार, उपशहरप्रमुख, शिवसेना, उबाठा.
नगरपरिषदेच्या हद्दीतील कोंबडवाडी भागात ४०० ते ५०० आदिवासी बांधवांसह इतर नागरिक राहतात. तसेच जनावरे पण आहेत. या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन केली असून टाकी बसवण्यात आली आहे. मात्र, या टाकीत पाणीच येत नाही. यामुळे येथे राहत असलेल्या नागरिकांची मोठी परवड झाली आहे. यासाठी नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करून देखील पाणी सोडले जात नाही. सध्या सहा ते सात दिवसानंतर एक टॅंकर पाण्याचा येत आहे. प्रशासन सुस्त असल्याने आदिवासी नागरिकांचे हाल होत आहे. – योगेश राऊत, ग्रामस्थ.
हेही वाचा –