नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संभाव्य टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी व नागरिकांना जुलै ते ऑगस्ट अखेर पाणी मिळेल यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई, चारा टंचाई आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आणि नितीन पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व चाराटंचाई जाणवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी सुव्यवस्थित नियोजन करावे, असे निर्देशित करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जुलै ऑगस्टअखेर पिण्याचे पाणी पुरेल, जनावरांना चारा उपलब्धता आणि लोकांनी रोजगाराची मागणी केली तर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून देणे या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना आतापासूनच पाणीबचतीचे आवाहन करत पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत काटकसरीने पाणी वापरावे. शेतीचे पाणी वाया जाणार नाही व सिंचनाला पाणी मिळेल, फळबागाही जगतील, या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक अंतर्गत जिल्ह्यात पाणीवापरासाठीचे विभागवार जलाशय, प्राधिकरणांतर्गत नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व पाणीनियोजन आदिंची माहिती सोनल शहा यांनी सादर केली. तसेच जिल्ह्यातील चारा उपलब्धता, बियाणे वाटप, पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपाययोजना आदिंबाबत सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा, उपलब्ध पाणीस्त्रोत, विहिरींचे अधिग्रहण, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर योजना, हाती घेण्यात आलेली कामे आदिंचे सादरीकरण करण्यात आले.
दरम्यान, यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा आढावाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी प्रगतीपथावर असलेल्या पेयजल योजनांची कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमण नियमित करा
२०११ पूर्वी ग्रामीण भागात गावठाण शासकीय जमिनीवर व शहरात निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल, अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी आखून दिलेली विहित पद्धती व निर्गमित केलेल्या शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी, व त्याला गती द्यावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. यासंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला. यामध्ये नियमित केलेली अतिक्रमणे, येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा :