Nashik News : कचऱ्यावर कर आकारणीस भाजपचा विरोध
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; स्वच्छता अभियानातील केंद्र शासनाच्या तरतुदी तसेच नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्याच्या नावाखाली केरकचरा संकलन व विल्हेवाटीपोटी नाशिककरांवर स्वतंत्र स्वच्छता कर लागू करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला भाजपने कडाडून विरोध दर्शविला आहे. घरपट्टीतील अवाजवी दरवाढीने नाशिककर आधीच पिचले असताना, स्वच्छता कराच्या रूपाने नवीन कर आकारल्यास महापालिकेविरोधात असंतोष निर्माण होईल, असा इशाराच भाजपने महापालिका आयुक्तांना दिला आहे.
भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ॲड. श्याम बडोदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेत त्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्याच्या नावाखाली स्वतंत्रपणे स्वच्छता कराच्या रूपाने दरमहा ६० ते २२० रुपयांचा बोजा टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. मात्र नाशिककरांवर यापूर्वीच अवाजवी करवाढ लादली गेली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात घरपट्टीचा दर अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच महापालिकेविषयी नाराजी आहे. त्यात स्वतंत्र स्वच्छता कराची आकारणी केल्यास महापालिकेविरोधातील असंतोष वाढीस लागेल. शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे झालेला मृत्यू, घंटागाडीची अनियमितता यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत नवीन कर लादणे चुकीचे आहे.
नाशिककरांवर आधीच अवाजवी घरपट्टी लागू केली आहे. त्यातच स्वच्छता कराच्या रूपाने नवीन कर लादल्यास महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल.
– प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप.
हेही वाचा :

