नाशिक : चोरीला गेलेला ट्रॅक्टर सापडला, दोघे चोर देवळा पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

नाशिक : चोरीला गेलेला ट्रॅक्टर सापडला, दोघे चोर देवळा पोलिसांच्या जाळ्यात

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील भऊर येथील शेतकरी मयूर सुरेश पवार यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर देवळा पोलिसांनी शोधला आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. देवळा पोलिसांनी जलदगतीने चोरीचा तपास करुन या चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

तालुक्यातील भऊर येथून शेतकरी मयूर पवार यांचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रक्टर दि. २ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत पवार यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना ट्रॅक्टर चोरीला जाणे हे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले. परिसरात या चोरीमुळे शेतकरी चिंतेत होते. पोलिसांपुढे टॅक्टरचा शोध घेणे म्हणजे मोठे आव्हान होते, पण देवळा पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रॅक्टर शोधून काढला आहे.

देवळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी पोलीस नाईक निवृत्ती भोये, इंद्रजित बर्डे, सागर पाटील यांनी तपास पथक नेमले. पोऊनी काळे यांनी पथकासह तपासाला सुरुवात केली. भऊर येथील ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेला यावर सुरुवातीला तपास सुरू झाला. देवळा शहरातील चहूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तेव्हा ट्रॅक्टर एका मोटरसायकलच्या मागाने मालेगावच्या दिशेने गेला हे तपासी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तपासी अधिकारी यांनी सीसीटीव्हीचा माग काढला तेव्हा त्याचे धागेदोरे मालेगाव मार्गे थेट चाळीसगाव तालुक्यापर्यंत पोहचल्याचे दिसले. एक मोटरसायकल पुढे चालून मागून ट्रॅक्टर जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून ट्रॅक्टर हा चाळीसगाव परिसरात गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या आणि त्यातून एक आरोपी निष्पन्न केला. चोराच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून पोलिसांनी सलग तीन दिवस तपास सुरू केल्यानंतर त्यातील एकास नाना युवराज ठाकरे रा. अजंग ता. मालेगाव यास चांदवड येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा संशयित रोहित हिरामण शिंदे रा. नारायनखेड ता. चांदवड याच्याकडे ट्रॅक्टर असल्याची माहिती त्याने दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावधगिरीने रोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ट्रॅक्टर मिळून आला. त्यांनी ट्रॅक्टर चाळीसगाव तालुक्यात विकण्याचा प्रथम प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर त्यांनी तो ट्रॅक्टर चांदवड परिसरात आणून लपवून ठेवला होता. कुठल्याही प्रकारचे धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास व रात्रंदिवस मेहनतीच्या जोरावर या चोरीचा छडा लावला. चोरीस गेलेला ट्रॅक्टर परत मिळाल्याने फिर्यादी शेतकरी यांनी देवळा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. संबंधित शेतकऱ्यावर ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत ओढवलेले मोठे संकट दूर झाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सदर तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button