नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पालक, शिक्षक रागावणे किंवा काही कारणांनी किरकोळ वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र, अशाच कारणातून तीन लहान मुलांनी थेट घर सोडून दिल्याचा प्रकार पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. मात्र, पोलिसांनी तक्रार मिळताच विलंब न लावता तांत्रिक विश्लेषण, नातलग व मित्रपरिवाराकडे चौकशी करीत तिघांनाही शोधले. तिघांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश असून त्यांची समजूत काढून पालकांच्या स्वाधिन करण्यात आले.
लहान मुले-मुली अभ्यासाच्या दबावामुळे, कधी प्रेमप्रकरण, तर कधी पालक किंवा शिक्षकांनी ओरडल्यामुळे घरात कोणालाही न सांगता निघून जात असल्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. त्यामुळे अशा बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास तातडीने करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाला दिले आहेत. त्यानुसार पंचवटीत तीन दिवसांत बेपत्ता झालेल्या तीन मुला-मुलींचा शोध पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथुन परदेशी, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, अंमलदार अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, राकेश शिंदे, कुणाल पलचोरे, नितीन पवार, गोरक्ष साबळे यांच्या पथकाने केला. त्यात पथकाने गोपनीयरीत्या माहिती घेत बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेतल्याने काही तासांच्या आत बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध पोलिसांना घेता आला. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यावर किरकोळ कारणांतून घर सोडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. तिघांचेही समुपदेश करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
घरात किंवा शाळेत रागावणे, मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास, तर कधी किरकोळ कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. याबाबत तक्रारी आल्यास तत्काळ शोध सुरू केला जातो. पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवणे अपेक्षित आहे.
– अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी
हेही वाचा :