

Nashik Ganpati Visarjan 2026 Dhol Tasha Pathak
नाशिक : नाशिकमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणपती मंडळांना पोलिसांनी दणका दिला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत असलेले आणखी एक ढोल पथक पोलिसांनी बाहेर काढले. मिरवणुकीपूर्वीच एका पेक्षा जास्त ढोलपथक असल्याने पोलिसांनी एका पथकाला माघारी पाठवलं होते. त्यापाठोपाठ आणखी एका ढोलपथकावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बारा दिवसांच्या गणेशोत्सवाची शुक्रवारी सांगता होत असून सकाळपासूनच नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली आहे. दुपारी बारानंतर सार्वजनिग मंडळांच्या मिरवणुकांना वेग आला.
नाशिक पोलिसांनी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला केवळ एका ढोल पथकाची परवानगी दिली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी दणका दिला. शुक्रवारी मिरवणूक सुरू होताच महापालिका गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत तीन ढोल पथके असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढले,
दरम्यान, महापालिकेचा माना गणपती प्रथम निघाला असून पहिला दहा मंडळांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तर उर्वरित मंडळांचा क्रम रांगेनुसार ठरवण्यात येणार आहे. तसेच वेळ चुकल्यास मंडळांना शेवटच्या क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर तसेच अतितीव्र लेझर लाइट्सच्या वापरावर निर्बंध आहेत.