

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; 'एमडी'च्या आहारी गेल्याने तरुणाईचे नुकसान होत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे मुंबईतील साकीनाका पोलिसांनी छाेट्या-मोठ्या ड्रग्ज पेडलरवर कारवाई करीत नाशिक गाठले. त्यानंतर नाशिकमध्ये संशयितांवर आठवडाभर पाळत ठेवून पुरावे गोळा केले. तसेच या साखळीतील संशयित जिशान इकबाल शेखला अटक करून शिंदेगावातील कारखान्यावर कारवाई केली. यात पोलिसांनी तब्बल १३३ किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करीत अमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का दिला. त्यानंतर नाशिक पोलिसांनीही दुसऱ्या कारखान्यावर कारवाई करत पाच किलो ड्रग्ज जप्त केले. आता ड्रग्ज साखळीतील इतर संशयितांचा शोध सुरू केल्याने या गुन्ह्यातील पाळेमुळे व अनेक चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Nashik Drug Case)
ऑगस्ट महिन्यात साकीनाका पोलिसांनी एकाला पकडून त्याच्याकडून १० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले. त्यानंतर या गुन्ह्याच्या खोलात गेल्यानंतर धारावीतून आणखी तिघांना पकडून त्यांच्याकडूनही ड्रग्ज, शस्त्रे व रोकड जप्त केली. त्यानंतर जे. जे. मार्गावर कारवाई करून सव्वा किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. या संशयितांच्या तपासातून कल्याणमधील संशयिताचे नाव समोर आले. त्याच्याकडूनही १५ किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर नाशिकचे धागेदोरे हाती आल्यानंतर साकीनाका पोलिसांच्या ११ जणांचे पथक नाशिकमध्येच ठाण मांडून बसले. त्यांनी पुरावे गोळा करीत जिशानला पकडले. एमडी तयार करणाऱ्या कारखान्यावरच कारवाई केल्याने या धंद्यातील साखळी उजेडात आली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ललित पानपाटील अद्याप फरार असल्याने पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे.
खत तयार करण्याचा कारखाना
पोलिसांनी पाळत ठेवल्यानंतर जिशान ज्या कारखान्यात जात होता, तेथे शेतीसाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन केले जात असल्याचे वातावरण संशयितांनी निर्माण केले होते. मात्र, पोलिसांनी पाळत ठेवून व चौकशी करीत खत नव्हे, तर एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे शोधून काढले. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) कारवाई करीत कारखाना उद्ध्वस्त केला व १३३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते.
हेही वाचा :