बेडग लाँग मार्चमध्ये सहभागी वृद्धाचे निधन | पुढारी

बेडग लाँग मार्चमध्ये सहभागी वृद्धाचे निधन

सांगली, पुढारी वृत्तसेवा : बेडग (ता. मिरज) येथील स्वागत कमानीचे दोन खांब पाडल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाकडून लाँग मार्च काढला होता. त्यामध्ये सहभागी किसन सुबराव कांबळे (वय 90) यांचा गुरुवारी (दि. 12) मृत्यू झाला.

कमानीचे खांब पाडल्याप्रकरणी बेडग येथून 11 सप्टेंबर रोजी आंबेडकरी समाज कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे गेला होता. 12 सप्टेंबरपासून माणगावपासून मुंबई अशा लाँग मार्चला सुरुवात झाली होती. यामध्ये आंबेडकरी समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रश्न सुटावा म्हणून आंबेडकरी समाजाच्या वतीने सांगलीतही आंदोलन केले होते. तसेच सातारा येथेही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. परंतु, अद्याप तोडगा निघाला नव्हता.

त्यामुळे मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन लाँग मार्च सुरू ठेवला होता. हा लाँग मार्च पुणे जिल्ह्यातील वाकड येथे गेल्यानंतर यात सहभागी झालेले वृद्ध किसन कांबळे यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर सहकार्‍यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. परंतु सकाळी तब्बेत ठीक न झाल्याने त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

Back to top button