

Nashik BJP Political Drama: राज्याच्या राजकारणात सध्या नाशिकमधील घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद आणि त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः त्यांनी संजय राऊत यांचं नाव उदाहरण म्हणून घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
नाशिकमध्ये भाजपकडून उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याच्या हालचाली सुरू असतानाच काही नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपमध्येच तीव्र नाराजी समोर आली. ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांसह काँग्रेसमधील शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश जाहीर होताच आमदार देवयानी फरांदे यांनी उघडपणे विरोध केला. या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
भाजपा कार्यालयात फरांदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि अखेर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. कार्यालयाचा परिसर काही काळासाठी पोलीस छावणीसारखा दिसत होता.
या सगळ्या गदारोळातही भाजपने आपला निर्णय कायम ठेवत विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्यासह पाच नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश करून घेतला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. बाहेर आंदोलन सुरू असतानाच आत पक्षप्रवेश झाल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद दिसून आले.
यानंतर पत्रकारांनी गिरीश महाजन यांना थेट प्रश्न विचारला की, जे नेते आजपर्यंत भाजपवर टीका करत होते, त्यांनाच पक्षात का घेतलं जात आहे? यावर उत्तर देताना महाजन यांनी केलेलं विधान चर्चेत आहे.
महाजन म्हणाले की, राजकारणात विरोध आणि टीका ही कायमस्वरूपी नसते. “आज जे आमच्यावर टीका करत होते, ते उद्या आमच्यासोबत येऊ शकतात,” असं सांगत त्यांनी उदाहरण म्हणून थेट संजय राऊत यांचं नाव घेतलं. “उद्या संजय राऊत आमच्याकडे आले, तरी त्यात काही आश्चर्य वाटायला नको,” असं विधान त्यांनी केलं.
या विधानातून भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचं महाजनांनी सूचित केलं. ते म्हणाले की, याआधीही अनेक नेते भाजपवर, पंतप्रधानांवर आणि वरिष्ठ नेत्यांवर कठोर टीका करत होते. मात्र, तेच नेते आज भाजपमध्ये आहेत आणि त्यातील अनेकजण आमदार, मंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. “पक्ष वाढतोय, हीच खरी गोष्ट आहे,” असं सांगत त्यांनी टीकांना फारसं महत्त्व दिलं नाही.
महाजनांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेषतः संजय राऊत यांचं नाव घेऊन केलेल्या विधानामुळे ठाकरे गटातही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील पक्षप्रवेशाचा मुद्दा आता स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील हे अंतर्गत मतभेद यांचा आगामी राजकीय गणितांवर काय परिणाम होईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.