

Nashik Mahanagarpalika Election 2026: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. भाजपने विरोधकांमधील नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती आखल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
आज ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, तसेच यतीन वाघ आणि शाहू खैरे हे नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. हे नेते भाजप कार्यालयात पोहोचल्याची माहिती समोर आली, मात्र त्यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक पातळीवरच तीव्र विरोध झाला आहे. भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपमध्येही या विषयावर मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे.
या घडामोडींवर ठाकरे गटाकडून तात्काळ आणि कठोर निर्णय घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून जाहीर करत विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. पक्षविरोधी भूमिका आणि हालचालींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं असून, हा निर्णय थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झाल्याचंही नमूद केलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणल की, ''पक्ष विरोधी कारवायां बद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!''
या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात वातावरण तापलं असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीआधीच सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.