

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला येथील दहेगाव पाटोदा येथील साग वृक्षतोड परवानगी मंजूर करून देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत सहा वन कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला.
या याप्रकरणी सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक पूनम केकर यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने येवला तालुक्यातील शेतातील २ हेक्टर ४ आर क्षेत्रातील सागाची झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.
संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करीत कायदेशीर परवानगी मिळण्याची अपेक्षा असताना हे काम मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून खासगी व्यक्तींच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये भाऊसाहेब पंढरीनाथ माळी (वनपाल), पंकज राजेंद्र नागपुरे (वनरक्षक), प्रवीण बाळासाहेब भोसले (कनिष्ठ लिपिक), आकाश नामदेव कोळी (कार्यालयीन वनरक्षक), विजय शिवाजी लोंढे (वनमजूर), रामनाथ लक्ष्मण भोरकडे (वनमजूर) यांच्यासह निखिल सुनील आरणे (डेटा ऑपरेटर) आणि सुनील भगवान भुरूक (खासगी चालक) यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
तक्रारदाराकडून सुरुवातीला १९ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती ११ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित झाल्याचे एसीबीने केलेल्या पडताळणीनंतर स्पष्ट झाले. त्यात ५०० रुपयांच्या २३ नोटांचा समावेश होता. संबंधितांनी स्वतः साठी तसेच इतरांना वाटप करण्यासाठी ही रक्कम मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रतिमा आबूज, हवालदार प्रल्हाद खांडवी, किरण धुळे, प्रभाकर गवळी, गणेश निंबाळकर, नितीन नेरोळे यांनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक प्रतिमा आबूज अधिक तपास करीत आहेत.