

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अक्षय्य तृतीयेपासून पारंपरिक पद्धतीने आंबा खाण्याची सुरुवात होते. मात्र, यंदा धोंड्याचा महिना आल्याने बाजारात आंब्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आकडेवारीनुसार हापूस आंब्याला प्रतिक्विंटल २४ हजार रुपये, तर केशरला १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने जावयाच्या ताटातील आमरसही महागला आहे.
आंबा हा फळांचा राजा मानला जात असून, उन्हाळ्यातील त्याचे विशेष महत्त्व असते. विशेषतः लग्नसराई, पाहुणचार आणि जावयाच्या जेवणात आमरसाला मानाचे स्थान असते. मात्र, यंदा बाजारात अपेक्षित प्रमाणात आवक वाढत नसल्याने आंब्याच्या किमती चांगल्याच वाढल्या आहेत.
परिणामी, घरगुती आमरसाचा खर्च वाढला असून, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हापूस आणि केशर या लोकप्रिय जातींच्या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते हवामानातील बदल, उत्पादनात घट आणि मर्यादित आवक यामुळे बाजारभाव चढे आहेत. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.