नाशिक : जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार

नाशिक : जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंतिम मतदारयाद्या मंगळवारी (दि. २३) प्रसिद्धी करण्यात आल्या. अंतिम यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४७ लाख ४८ हजार १३ वर पोहोचली आहे. त्यामध्ये २४ लाख ७४ हजार ३३७ पुरुष व २२ लाख ७३ हजार ७०२ महिला मतदार आहेत. ११४ तृतीयपंथी मतदार आहेत. विशेष मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात ९७,५१७ नवमतदार वाढले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी शर्मा बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार मंजूषा घाडगे उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार १ जानेवारी २०२४ वर आधारित मतदारयाद्या यावेळी घोषित करण्यात आल्या. विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने १८ व १९ वयोगटातील युवक तसेच महिलावर्गावर अधिक लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यातील मतदारांचा त्याला अधिक चांगला प्रतिसाद लाभला. या मोहिमेत ९७ हजारांहून अधिक नवमतदार वाढले आहेत. तर १५ विधानसभा मतदारसंघात ७३ हजार ८६६ दुबार नावे वगळल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विशेष माेहिमेवेळी पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या टक्क्यात वाढ झाली. त्यामध्ये ४८,४४५ पुरुष मतदारांची नोंद प्रशासनाने केली. त्याचवेळी ५६ हजार ३८ महिला मतदारांनी यादीत नावे समाविष्ट केली. महिलांचा मिळालेला प्रतिसाद बघता प्रारूप यादीच्या तुलनेत अंतिम मतदारयादीत दर हजार पुरुषांमागे लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात सहाने वाढ होऊन ती ९१९ वर पोहोचले आहे. दरम्यान, अंतिम यादीची प्रसिद्धी झाली असली तरी मतदार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे लोकसभेपूर्वी अधिकाधिक नवमतदारांनी यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केला आहे.

मतदार नोंदणी मोहिमेसाठी जिल्ह्यातील मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. विशेष करून नवयुवकांनी यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. युवकांनी हाच उत्साह कायम ठेवत लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून प्रशासनाला सहकार्य करावे. – जलज शर्मा, जिल्हाधिकारी.

अंतिम मतदारयादी दृष्टिक्षेप
-जिल्ह्यात ११४ तृतीयपंथी मतदार
-दिव्यांग मतदारांची संख्या १९२८७
-जिल्ह्यात ५६ अनिवासी, ९०४० सैन्य दलातील मतदार
-नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ४ लाख ३८ हजार ३७५ मतदार
-इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघात सर्वात कमी २,७०,१९६ मतदार
-लिंग गुणोत्तरमध्ये कळवणला हजार पुरुषांमागे ९६५ महिला मतदार
-नाशिक पश्चिममध्ये १००० पुरुषांमागे सर्वात कमी ८५८ महिला मतदार
-जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ७३९

मतदारसंघनिहाय संख्या

नांदगाव ३२७०२२, मालेगाव (मध्य) २९६००२, मालेगाव (बाह्य) ३५३६७०, बागलाण २८४३३१, कळवण २९१९७९, चांदवड २९५२९९, येवला ३०९९७६, सिन्नर ३०३९३४, निफाड २८७९१९, दिंडोरी ३१८६७८, नाशिक पूर्व ३७८२८९, नाशिक मध्य ३२१६४४, नाशिक पश्चिम ४३८१६७, देवळाली २७१३५६, इगतपुरी २६९८८७.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news