महत्वाची बातमी ! शिक्षक भरती जाहिराती 29 जानेवारीपर्यंत येणार | पुढारी

महत्वाची बातमी ! शिक्षक भरती जाहिराती 29 जानेवारीपर्यंत येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार येत्या 29 जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर दिलेल्या जाहिराती एकत्रित पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जाहिरातीमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

त्यानुसार स्थानिक स्वराज संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा 15 जानेवारीपर्यंत दिली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा, या हेतूने ही मुदत 22 जानेवारीपर्यंत वाढविली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली. दिलेल्या कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक 24 जानेवारीपर्यंत पूर्ण करता येईल.
विभागीय शिक्षण उपसंचालक/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील, असेही नमूद केले आहे.

Back to top button