

नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा):
खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी स्वतःला वकील म्हणतात, परंतु त्यांची डिग्री एकदा तपासून घेतली पाहिजे, कारण 'जनजाती' हा शब्द संविधानात आहे, हेच त्यांना माहीत नाही; अशा शब्दांत माजी खासदार डॉ. हिना गाविट यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'जनजाती' शब्दावरून नंदुरबारच्या आजी-माजी खासदारांमध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नंदुरबारचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी 'जनजाती' या शब्दालाच विरोध असलेली भूमिका मांडत जनजाती गौरव दिनाला विरोध दर्शवला होता. तसेच, जनजाती आणि वनवासी हे शब्द आदिवासींसाठी वापरणे बंद करावे आणि 'जनजाती गौरव दिन' साजरा करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार डॉ. हिना गाविट म्हणाल्या की, भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या विरोधात लढा देत असताना अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी हुतात्मा झाले. आदिवासी शूरांचा गौरव केला जावा, या उद्देशाने १५ नोव्हेंबर रोजी 'जनजाती गौरव दिन' देशभरात साजरा केला जातो.
पुढे बोलताना डॉ. गाविट म्हणाल्या की, 'जनजाती' हा शब्द पूर्णपणे संवैधानिक आहे. भारतीय जनता पक्ष किंवा अन्य कोणी हा शब्द नव्याने आणलेला नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ संविधानातच अनुसूचित जमातीला म्हणजेच 'शेड्युल ट्राइब'ला उद्देशून या शब्दाचा उल्लेख आढळतो.
खासदार ॲड. पाडवी यांनी अशा प्रकारे विरोध करून अप्रत्यक्षपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केवळ फोटोसेशनपुरता संविधान हाती न धरता ते खरोखरच वाचले असते, तर असे वादग्रस्त वक्तव्य केलेच नसते, अशा शब्दांत डॉ. हिना गाविट यांनी पाडवी यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.