

नंदुरबार : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नंदुरबार जिल्ह्यातील मिठाई व नमकीन विक्री करणाऱ्या आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राबवली. १ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत भेसळयुक्त व मिथ्याछाप असल्याचा संशय असलेला २६ लाख ४१ हजार ९९ रुपये किमतीचा, एकूण ३ हजार ४८० किलो माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ६७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३१ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ८ प्रतिष्ठानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तपासणीसाठी एकूण ८२ नमुने घेण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये प्रामुख्याने मसाले, खाद्यतेल, नमकीन आणि मिठाईचा समावेश आहे. या पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले आणि संकेत सदाफुले यांनी पार पाडली.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा कृत्रिम (सिंथेटिक) रंग वापरू नये; मिठाईमध्ये रंगाचे प्रमाण मर्यादित असावे आणि हॉटेल व्यावसायिकांनी तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच दिवाळीनिमित्त स्टॉल लावून विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना अन्न नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.