

Nandurbar BJP Leader Case: नंदुरबारमध्ये भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्यासह तिघांविरोधात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत चौधरी, दिलीप राठोड आणि विजय कोठारी अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, दिलीप राठोड यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार येथील एकरूप हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, तक्रारीत एकरूप हॉटेल हे भाजपचे नंदुरबार शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी उर्फ पिंटू यांच्या मालकीचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रशांत चौधरी आणि विजय कोठारी यांनी आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा नंदुरबार तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. नंदुरबार तालुका पोलिसांनी प्रशांत चौधरी, दिलीप राठोड आणि विजय कोठारी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, तिन्ही आरोपींविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तक्रारीतील आरोप, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे यांचा तपास केल्यानंतर या प्रकरणातील नेमके तथ्य समोर येणार आहे.
भाजपच्या शहर उपाध्यक्षांविरोधातच गुन्हा दाखल झाल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होणार आहे.