

घोटी वार्ताहर : इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी परिसरातील आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत आजही रस्ता नसल्याने मानवी डोलीतून रुग्णालयात नेत असताना दोन आदिवासी रुग्णांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली ‘संस्थात्मक हत्या’ असल्याचा आरोप करत एल्गार कष्टकरी संघटनेने मुंबई–नाशिक महामार्गावर संतप्त रास्ता रोको आंदोलन केले.
“कॉर्पोरेटसाठी झटपट महामार्ग, पण आदिवासींसाठी मानवी डोली आणि मृत्यू का?” असा सवाल करत आंदोलकांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर कडाडून टीका केली. आदिवासी वाड्यांपर्यंत रस्ते देण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात वृद्ध, तरुण, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. भर उन्हात माता आपल्या चिमुरड्यांना घेऊन आंदोलनस्थळी बसल्या होत्या. रस्त्याअभावी जीव गेले तरी प्रशासन संवेदनशील न झाल्याचे चित्र पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.
रास्ता रोकोमुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, तहसीलदार अभिजीत बारवकर, निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व बांधकाम अधिकारी अनिल बैसाने घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालयात तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मृत आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली. “रस्ते मिळेपर्यंत आणि मृत्यू थांबेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.