

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या संशयिताकडे तपास सुरू असताना एका कुटुंबातील सात सदस्यांसह आणखी एकाने पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याची घटना ८ फेब्रुवारी २०१८ रोजी सातपूर येथील प्रबुद्धनगर परिसरात घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आठही आरोपींना तीन महिने साधा कारावास व प्रत्येकी दीड हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांची चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताकडे चौकशी सुरू होती. चोरीचा मुद्देमाल पोलिसांना देण्यासाठी संशयित चोरटा पोलिसांसह प्रबुद्धनगर परिसरात आला. त्यावेळी परिसरात उभा असलेल्या आनंदा ऊर्फ अनिल विठ्ठल पालवे (२५, प्रबुद्धनगर) याच्याकडे चाकू आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी आनंदास ताब्यात घेतले. त्यामुळे रामदास विठ्ठल पालवे (३३) याने आरडाओरड करीत गोंधळ घातला. त्याच्या जोडीला संतोष विठ्ठल पालवे (३१), समाधान विठ्ठल पालवे (२२), विठ्ठल बबन पालवे (५३), सोनी रामदास पालवे, वेनुबाई विठ्ठल पालवे (सर्व रा. प्रबुद्धनगर) यांच्यासह दीपक ऊर्फ आबा भास्कर अहिरे (२५, रा. एकलहरे) यांनी आरडाओरड करीत गोंधळ घातला. तर दीपकने पोलिस हवालदार डी. के. पवार यांना मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यामुळे आठही जणांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रवींद्र एल. निकम यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. जे. मोरे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एस. डी. सोनवणे, जी. आर. चिखले यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा :