India-Bharat : ‘इंडिया’चे नामांतर भारत होणार? | पुढारी

India-Bharat : ‘इंडिया’चे नामांतर भारत होणार?

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा, India-Bharat : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 साठीच्या मेजवानी समारंभाच्या निमंत्रण पत्रावर रिपब्लिक ऑफ इंडिया परंपरागत पद्धतीने वापरल्या जाणार्‍या शब्दाऐवजी रिपब्लिक ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे वादाचे नवे मोहोळ उठले आहे. संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनामध्ये यासाठीचे विधेयक सरकारतर्फे आणले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपने या संभाव्य बदलाचे स्वागत केले आहे, तर विरोधकांनी यावरून रान उठवले आहे.

सत्ताधारी वर्तुळातून राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेमधील भारत या उल्लेखाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून या प्रकरणाबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशाचा सन्मान आणि अभिमानाशी संबंधित प्रत्येक विषयावर काँग्रेसचा इतका आक्षेप का आहे? भारत जोडोच्या नावाने राजकीय दौरे करणार्‍यांना भारत माता की जय या घोषणेचा तिरस्कार का आहे? काँग्रेसला ना देशाबद्दल आदर आहे, ना देशाच्या संविधानाचा, ना घटनात्मक संस्थांचा आदर आहे. त्यांना फक्त एका विशिष्ट कुटुंबाची स्तुती करण्याची काळजी आहे. भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ यादव यांनीही देशाचे नाव बदलून भारत ठेवावे, अशी मागणी केली होती. भारत हा आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. प्राचीन काळापासून देशाचे नाव भारत आहे, असेही ते म्हणाले.

India-Bharat : इंडिया नव्हे, भारतच ः सरसंघचालक

शुक्रवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान लोकांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे, इंडिया नाही. आपण जगात कुठेही गेलो तरी देशाचे नाव सर्वत्र भारतच राहिले पाहिजे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 परिषदेसाठी येणार्‍या राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी होणार्‍या मेजवानी सोहळ्याच्या पत्रामध्ये रिपब्लिक ऑफ भारत (भारतीय प्रजासत्ताक) असा शब्दप्रयोग केला. या निमंत्रण पत्राचा दाखला देत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा प्रकार संघराज्य रचनेवर हल्ला असल्याची टीका केली आहे. यानंतर विरोधी पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

विरोधकांच्या इंडिया आघाडीला घाबरून मोदी सरकार देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. येत्या 18 ते 22 दरम्यान होणार्‍या संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार नामबदलाचे विधेयक आणण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

India-Bharat : भारत आणि इंडियात काही फरक नाही ः पवार

इंडिया नाव हटवण्याबाबत मला कसलीही माहिती नाही. इंडिया नाव हटवण्याचा कोणाला अधिकार नाही. भारत काय आणि इंडिया काय, यामुळे कोणताही फरक पडत नाही . इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झाले आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल. भाजपाचे उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी काम करू असे शरद पवार यांनी सांगितले.

India-Bharat : मोठा निर्णय ः धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, राष्ट्रपतींच्या निमंत्रणात कऱण्यात आलेला भारत हा उल्लेख म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणारा मोठा निर्णय असल्याची सूचक टिप्पणी केली आहे.

India-Bharat : भारत हेच खरे नाव ः लेखी

उत्तरेकडून पाहिल्यास समुद्र आणि दक्षिणेकडून पाहिल्यास हिमालय दिसतो आणि यामधील भूभाग भारत आहे, या विष्णुपुराणातील श्लोकाचा दाखला देत परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी, देशाला भारत हे नाव पूर्वजांनी दिले असल्याचे सांगितले. आता विष्णुपुराणावर कोणाचा आक्षेप असू शकतो, असा सवालही त्यांनी केला.

India-Bharat :  इंग्रजीतील नाव नकोच ः सरमा

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी आपल्या देशाचे नाव इंग्रजीत का असावे, असा सवाल केला. देशाचे नाव भारतीयच असावे, अशी पुस्तीही जोडली. आपला देश भारत होता आणि भारत आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रा का काढली, इंडिया जोडो का नाही,अशी उपरोधिक टिप्पणी करताना त्यांनी काँग्रेस पक्ष हिंदूंच्या व भारताच्या विरोधात असल्याचा आरोप केला.

India-Bharat : संभाजीराजेंकडून स्वागत

इंडियाचे नाव भारत करणार असेल तर त्याचे स्वागतच आहे असे माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, हा नामबदल करण्यात चुकीचे काहीही नाही. इंडिया हे नाव ब्रिटिशांच्या काळात आले. भारत हे नाव प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे भारत हे नाव येणार असेल ती चांगली गोष्ट आहे.

India-Bharat : ममता बॅनर्जी केजरीवाल यांची टीका

भारत असे नामकरण करण्याचा विषय अचानकपणे समोर आणण्यात आला आहे. नेमके असे काय घडले की, सरकारला एवढ्या गडबडीत हा मुद्दा उपस्थित करावा लागला हे मलाही समाजलेले नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या आघाडीला घाबरून हे पाऊल उचलण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, मला अधिकृतपणे याबद्दल काहीही माहीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, विरोधक एकत्र येत असल्याचे पाहून भाजपने हा नामांतराचा घाट घातल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

India-Bharat : बिग बी, सेहवागकडूनही स्वागत

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या विषयावर भारत माता की जय असे केवळ एका ओळीचे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही भारत हेच नाव योग्य असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय खेळाडूंच्या अधिकृत पोशाखावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख असला पाहिजे, असे आग्रही मत त्याने व्यक्त केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button