

नाशिक : द्वारका येथे होत असलेली वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाला द्वारका येथेच दिलेले एक्झिट आणि विनावापर असलेला भुयारी मार्ग याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी प्रश्न उपस्थितीत केल्यानंतर, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नागपूर येथे मुख्यमंत्री सचिवालयात राष्ट्रीय महामार्ग संदर्भात करावयाच्या सुधारणांबाबत आयोजित बैठकीत केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी, आगामी सिंहस्थापूर्वी द्वारका येथील उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी द्वारका सर्कलच्या अलीकडे उड्डाणपुलाला एक्झिट दिले आहे. त्यानंतर कुठेही एक्झिट दिलेले नाही.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व वाहतूक द्वारका सर्कलमार्गे जाते. त्यामुळे औरंगाबाद नाक्यापर्यंत उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी नवीन मार्ग करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच द्वारका येथील अंडरपास पादचारी मार्ग हे कोणत्याही प्रकारच्या उपयोगाचे नसल्याने ते बंद करण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित व मुख्य अभियंता हांडे यांना द्वारका सर्कलचा अभ्यास करून करंबोळीच्या धर्तीवर पूल तयार केला जावा, तसेच याबाबतचा सविस्तर पाहणीचा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही द्वारका सर्कलप्रश्नी, दोन टप्प्यांत काम होणार असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात सिंहस्थापर्यंत जे काम होईल, ते करण्यात येणार आहे, तर सिंहस्थ काळात दुसऱ्या टप्प्याची देखील वर्कआॅर्डर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामाला वेळ लागणार असल्याने, ते सिंहस्थानंतर काम सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
दै. पुढारीने गेल्या शुक्रवारी (दि. 18) द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीचा ’सर्कल हटवले, भुयारी मार्गाचे काय?’ या मथळ्याखाली ’ग्राउंड रिपोर्ट’ मांडला. सर्कल हटविल्यानंतर वाहतूक कोंडी दूर होण्यास किती फायदा झाला? तसेच वाहतूक कोंडी आणखी काय अडथळे आहेत याबाबतचे निरीक्षण ’दै. पुढारी’ने सादर केले होते. भुयारी मार्गाचे चारही बाजूने असलेले डोम वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे ‘ग्राउंड रिपोर्ट’मध्ये प्रामुख्याने नमूद केले होते.