

नाशिक : राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांचे कान टोचल्यानंतर नाशिक महापालिकेने पोलिस बंदोबस्तात रविवारी (दि. १५) अत्यंत वर्दळ आणि वाहतूक कोंडीच्या द्वारका सर्कल परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा मारला.
रविवार सुटीचा दिवस असूनही सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत ही अतिक्रमण मोहीम सुरू होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून उड्डाणपूल देखभाल - दुरुस्ती कामामुळे शनिवार ते सोमवार (दि.16) रोजी सकाळीपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून या रविवारी वाहनचालकांसह प्रवाशांची सुटका झाली.
मुंबई- आग्रा महामार्ग अन् पुणे मार्गावरील द्वारका सर्कलच्या पाचवीलाच वाहतूक कोंडीची समस्या पूजलेली आहे. उड्डाणपूल झाल्यानंतरही येथील प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यातच उड्डाणपुलाच्या देखभालीचे काम हाती घेतल्यानंतर काही दिवसांपासून शनिवार ते सोमवार सकाळपर्यंत उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवली जात आहे. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होऊन वाहतूक संथ होऊन लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यावर उपाययोजना करण्यात एकूणच यंत्रणांनी केलेला कानाडोळा मंत्री भुजबळ यांनी गांभीर्याने घेत शनिवारी (दि. १४) द्वारका सर्कलची पाहणी केली. तेव्हा अतिक्रमण, अस्वच्छता आणि अवैध वाहतुकीवर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.
वाहतूक कोंडीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करत त्यांनी महापालिका, शहर वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. या तिन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्यामुळे भुजबळांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘कोणाचे काय काम आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही तुमचे काम करा, नाहीतर मग मला माझे काम करावे लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या परखड भूमिकेमुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर रविवारी (दि. 15) सकाळी ८ पासून द्वारका परिसरात युद्धपातळीवर अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यात ट्रॅक्टर हाउसपासून मुंबई नाका सर्कलपर्यंतची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वाखाली, दुकानदारांनी रस्त्यावर वाढविलेले अतिक्रमण, भिंती, पत्र्याचे शेड्स, टपर्या, जाहिरात फलक, दुकानांचे बोर्ड्स आदी जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले. द्वारकापासून मुंबई नाका सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे काढण्यात आली. द्वारका सर्कलही काढून टाकण्यात आल्याने, सरळ वाहतूक सुरू झाली आहे. शहर पोलिस दल, आरएएफची तुकडी, महिला पोलिस, महापालिकेचे सुरक्षा बल यांसह अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर होते.
द्वारका चौक हे नाशिकचे प्रवेशद्वार मानले जाते. मुंबई- आग्रा मार्गावरील वाहने, पुणे मार्गावरील वाहने ही द्वारका चौकातूनच पुढे जातात. याशिवाय सकाळ- सायंकाळ कार्यालये सुटल्यावर द्वारका चौकातूनच वाहने पुढे जातात. त्यामुळे या परिसरात होणारी प्रचंड कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील 10 दिवसांपासून हे काम सुरू होते. अखेर शनिवारी (दि. १४) चौकात सरळ रस्ता तयार होऊन द्वारका सर्कल इतिहासजमा झाला. मात्र तरीही वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे परिसरातील अतिक्रमणे रडारवर आलीत.
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रमाणे द्वारका परिसरातील अतिक्रमण काढलेले आहे. पोलिस प्रशासनही आगामी काळात सजगपणे काम करून अनधिकृत टॅक्सी थांबे व खासगी बस थांबे होऊ देणार नाहीत. नाशिकच्या जनतेचा प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.
देवयानी फरांदे, आमदार, नाशिक
लवकरच हाजी अली धर्तीवर सिग्नल यंत्रणा
द्वारका चौकात हाजी अली (मुंबई)च्या धर्तीवर आधुनिक त्रिस्तरीय सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी दिले आहेत. हाजी अली परिसरात यशस्वीपणे कार्यरत असलेली ही सिग्नल प्रणाली वाहतुकीच्या वास्तव प्रवाहावर आधारित असते. सिग्नलवर येणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचा वेग आणि गती यानुसार सिग्नल आपोआप बदलतो. त्यामुळे अनावश्यक थांबे टाळले जातात आणि वाहतूक सुरळीत चालते. या प्रणालीमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जातात, जे वाहनांची संख्या आणि हालचाल अचूक टिपतात. संकलित डेटा रिअल टाइममध्ये वाहतूक नियंत्रण कक्षात पाठवला जातो. त्यामुळे वाहतुकीचे तत्काळ विश्लेषण करता येते. तसेच, वाहतूक पोलिसांना विशेष हँडहेल्ड डिव्हाइसेस देण्यात आले आहेत, त्याच्या साहाय्याने आवश्यकतेनुसार सिग्नल तत्काळ बदलता येतो. द्वारका चौकातील ही प्रगत यंत्रणा वाहतूक व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.