

नाशिक : टीम दैनिक पुढारी
शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या द्वारका चौकाला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटण्यासाठी 'सर्कल' हटविण्याचा पर्याय निवडला असला तरी, मुख्य प्रश्न पूर्णत: निकाली निघालेला नाही. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी चौकात केलेल्या भुयारी मार्गाचे चारही डोम वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने त्याबाबतदेखील वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे. याशिवाय द्वारका परिसरात हाती घेतलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत देखील सातत्य गरजेचे आहे. चौकातील अतिक्रमणे, वाहतूक नियोजन, सिग्नल यंत्रणा याबाबतची जबाबदारी प्रशासनाच्या विविध विभागांवर असल्याने त्यांच्यात समन्वयाची गरज आहे. एकूणच सर्व यंत्रणांनी योग्य जबाबदाऱ्या हाताळल्यास द्वारका चौक वाहतूक कोंडी मुक्त होऊ शकेल.
सर्कल हटविल्याने ३० ते ४० टक्के वाहतूक कोंडी दूर
चौकात पाच रिक्षा थांबे, बेशिस्त पार्किंगची समस्या कायम
दररोज १४ वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बंदोबस्त
सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे वाहनधारकांचा घोळ
भुयारी मार्ग की सार्वजनिक शौचालय? प्रचंड दुर्गंधी
भुयारी मार्गाचे चारही डोम वाहतूक कोंडीस कारणीभूत
एकाचवेळी चौकात आठ ते दहा सिटी बसेसची वाहतूक
पोलिस प्रशासन, महापालिका, महामार्ग प्राधिकरणाचे एकमेकांकडे बोट
नाशिक ‘आरटीओ’कडे एप्रिल २०२५ पर्यंत नांदणीकृत वाहनसंख्या - २२,९५,९६४
द्वारका सर्कल येथून दिवसभरात २४ तासात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या - दीड लाख
द्वारका चौकात दररोज १४ वाहतुक पोलिस तर १ अधिकारी तैनात
मुंबई - आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक सुरळित होईल, अशी नाशिककरांना अपेक्षा होती. मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी चौकातून मार्गक्रमण अधिकच बिकट झाले. विशेष म्हणजे, पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग उपयोगी तर ठरला नाही, मात्र, त्याचे चारही प्रवेशद्वारच (डोम) वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. सुरुवातीपासूनच हा भुयारी मार्ग बंद स्थितीत आहे. याशिवाय जुने नाशिक, सारडा सर्कलकडून येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे याठिकाणी कोंडीची समस्या अधिक क्लिष्ट बनत चालली आहे. दरम्यान, सर्कल हटविल्याने ३० ते ४० टक्के वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर झाला असला तरी, पूर्णत: कोंडी फोडण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयातून प्रभावी निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यात भुयारी मार्गाबाबत वेळीच निर्णय घेतल्यास, दळणवळण अधिक सुलभ होऊन वाहनधारकांना आणखी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. द्वारका चौकातील सर्कल हटविले असले तरी, भुयारी मार्गाचे अंडरपास व्हायला हवे. किंवा भुयारी मार्गाचे अतिक्रमण तत्काळ काढायला हवे. या दोन उपाययोजना झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकेल.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
द्वारका चौकातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी दररोज दोन सत्रांमध्ये १४ वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सात तर दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत सात असे १४ पोलिस तैनात असतील, एक वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी नियुक्त असेल. मात्र, अशातही वाहतूक कोंडी होत असल्याने, 'नियोजनाचा अभाव' हेच एकमेव कारण असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जाते.
द्वारका परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चौकातील सर्कल हटविण्यात आले. सध्या या ठिकाणी दगड, गिट्टी आणि मुरुम वापरून डब्ल्यूएमएमचा थर टाकला असून, पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करून सपाटीकरण करण्यात येईल. द्वारका सर्कल हटवल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्या समन्वयातून या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
एस. व्ही. ढगे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAHI)
द्वारका सर्कल परिसरात पाच अधिकृत रिक्षा थांबे असूनही अनेक रिक्षा चौकातील इतर ठिकाणी बेशिस्तपणे पार्क केल्या जातात. त्या वाहतुकीला अडथळा ठरतात. यासह इतर समस्यांवर उपाय योजन्यासाठी महापालिकेने विशेष सर्वेक्षकाची नियुक्ती केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्वेक्षकामार्फत प्रत्यक्ष पाहणी सुरू असून, त्यानंतर सविस्तर अहवाल महापालिकेकडे सादर होईल. त्यातील अभिप्रायानुसार योग्य ती उपाययोजना राबवली जाणार आहे
सर्कल हटविल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्यापैकी दूर झाली आहे. सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करण्याची गरज आहे. द्वारका चौकात पाच रिक्षा थांबे असून, त्यांना एक जागा निश्चित केल्यानंतर, वाहतूक कोंडीतील आणखी एक अडथळा दूर होईल. याशिवाय परिसरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांनाही जागा निश्चितीचे काम सुरू आहे.
डी. व्ही. वसावे, पोलिस निरीक्षक.
चौकातील भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी वापरात आला नाही. उलट या मार्गाचा अवैध धंद्यांसाठीच अधिक वापर केला गेला. गुन्हेगारांना भुयारी मार्ग आश्रयस्थान ठरत आहे. दरम्यान, या मार्गाचे 'अंडरपास'मध्ये रूंपातर केल्यास, वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. अंडरपासमधून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांना प्रवेश दिल्यास, मुख्य रस्त्यावरील वर्दळ विभागली जाईल. सध्या भुयारी मार्ग काटकोन स्थितीत आहे. त्यामुळे त्याचे रूंपातर अंडरपासमध्ये करायचे झाल्यास, त्याच्या आकारात योग्य बदल करावा लागेल
सारडा सर्कलकडून येणारी वाहने आणि मुंबई नाक्याकडून, वासन शोरूममार्गे सर्व्हिसरोडने येणारी वाहने द्वारका सर्कलवर आल्यानंतर दोन्ही बाजुच्या वाहनांना एकाचवेळी सिग्नल सोडला जात असल्याने, याठिकाणी प्रचंड कोंडी होते. सारडा सर्कलकडून येणाऱ्या वाहनांना नाशिकरोडकडे जायचे असते, तर मुंबई नाक्याकडून येणाऱ्या वाहनांना आडगावकडे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहने सिग्नलमुळे वाहतूक कोंडी करतात. यास वाहनधारकांची कुठलीही चुक नसून सिग्नल यंत्रणेतील दोषामुळेच हा सर्व प्रकार घडत असल्याचे पोलिसांचेच म्हणणे आहे.
द्वारका येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ‘सर्कल’ असल्याचे आम्ही यापूर्वीच महापालिका प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले होते. सर्कल काढण्यात यावे, यासाठी ६० ते ७० निवेदनेही दिलेत. उशिरा का होईना सर्कल काढल्याने प्रशासनाचे अभिनंदन. पण आता भुयारी मार्गाचे अंडरपासमध्ये रुपांतर केल्यास, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली लागेल.
राजेंद्र फड, चेअरमन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन
द्वारका चौकाच्या चारही बाजुने असलेली विक्रेत्यांची दुकाने महापालिकेच्या जागेत आहेत. दुकाने हटविण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विक्रेत्यांच्या बाजुने निकाल दिल्याने, त्यांची दुकाने हटविणे तुर्तास शक्य नाही. त्यावेळी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असते, तर निश्चित मार्ग निकाला असता. तुर्त या विक्रेत्यांना न्यायालयाचे अभय असल्याने, अतिक्रमण कसे हटविणार? हा यक्ष प्रश्न आहे.
संध्याकाळ झाली आणि अंधारा झाल्यावर या क्षणी मद्यपी, ड्रग्ज सेवन करणारे भुयारी मार्गाचा ताबा घेतात. शौचालय म्हणूनही या मार्गाचा वापर होत असल्याने वाईट वाटते. परिणामी प्रचंड दुर्गंधीमुळे या ठिकाणी उभे राहणेही शक्य होत नाही. पोलिस येतात, वरवर पाहणी करुन निघून जातात. मात्र, उपद्रवी गर्दुले आतच राहतात. रात्री या ठिकाणी रिक्षा थांबवायलाही भिती वाटते.
कय्युम शेख / कैफ शेख, रिक्षाचालक, नाशिक
द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या कंपन्यांच्या बसेस सर्व्हिस रोडवर पार्क करून तेथूनच प्रवाशांची चढउतार केली जाते. ही बाब वाहतूक कोंडीचे निमित्त ठरते. कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन सुरू असून, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सर्व्हिस रोडऐवजी उड्डाणपुलाच्या रॅम्पखाली बसेस पार्क करण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत रॅम्पखाली अस्वच्छता आणि भिकाऱ्यांचे बस्तान आहे. तेथे ट्रॅव्हल्सचा थांबा झाल्यास अस्वच्छतेसोबतच सर्व्हिस रोडवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, द्वारका चौकात धुळे मार्गावर धावणाऱ्या जीप गाड्यांचा अनधिकृत थांबा आहे. या गाड्या देखील रस्त्यावरच पार्क केल्या जातात. यांनाही रॅम्पखाली जागा दिल्यास वाहतुकीला मोठा दिलासा मिळू शकतो.
भुयारी मार्गाचा उपद्रवींनाच लाभ होत आहे. रस्त्यावरील वाहतुकीसाठी हे डोम अडथळे ठरत असून, ते अतिक्रमणासारखेच आहेत. हे मार्ग दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी खुले केल्यास मुख्य मार्गावरील वर्दळी कमी होण्यास हातभार लागेल. सद्यातरी ते निरुपयोगीच आहे. त्यांचा योग्य वापर करायचा नसेल तर कायमस्वरुपी काढून टाकलेलेच चांगले.
अझिम सईद, दुकानदार, नाशिक.
द्वारका चौकात चारही दिशांनी पाच रिक्षाथांबे आहेत, या थांब्यांवरील रिक्षा बेशिस्तपणे रस्त्यात उभ्या असतात. परिणामी शहरात येणार्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मूळात रिक्षाथांब्यांवर किती रिक्षांना थांबण्याची परवानगी आहे, याची तपासणी होणे गरजेचे आहे. आरटीओ, वाहतूक पोलिस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे.
द्वारका चौकातील दळणवळण गतीमान होण्यासाठी पुणेच्या धर्तीवर अंडरपास तयार करायला हवेत. आजघडीला पादचाऱ्यांसाठी तयार केलेले भुयारी मार्ग व्यर्थ ठरले आहेत. तज्ज्ञांच्या अभ्यासातून हे मार्ग अंडरपासमध्ये रुपांतरीत केल्यास हलकी वाहने तेथून मार्गस्थ होऊन किमान नाशिकरोड-नाशिक मार्गावरील वाहतूक विभागली जाऊन चौकावरील ताण आपसूक कमी होईल.
साजिद मुल्तानी, नागरिक, नाशिक.