Nashik Drought Scarcity | नाशिक जिल्ह्यात धरणे भरली, पण शेतकरी चिंताक्रांत! वगळलेल्या 5 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती

Nashik Drought Scarcity | ऑगस्टमध्ये पावसाचा खंड; सप्टेंबरअखेरही तूटी : नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड, त्र्यंबकेश्वरच्या फेरआढाव्याची मागणी
Nashik Drought Scarcity
Nashik Drought ScarcityPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असले, तरी त्यातून वगळण्यात आलेल्या नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतही पावसाचे प्रमाण पाहता, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Nashik Drought Scarcity
Nashik Accidental Death | नाशिक जिल्ह्यात काळाचा घाला! वेगवेगळ्या अपघातांत अन् दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

जुलैमध्ये झालेला मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात वाहून गेला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडला आणि आता सप्टेंबरमध्येही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या अंतिम अवस्थेत पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे या पाच तालुक्यांचा दुष्काळाच्या निकषानुसार फेरआढावा घेण्याची मागणी होत आहे.
नाशिक तालुक्यात जून ते ऑगस्टदरम्यान ६३५.९ मिमी पाऊस झाला असला, तरी सप्टेंबरची सरासरी १३३.२ मिमी असताना, केवळ ४३.५ मिमी म्हणजेच ३२.७ टक्के पाऊस झाला. जून - सप्टेंबरअखेर ६७९.४ मिमी पाऊस झाला असून, तो मागील वर्षाच्या ७१२.२ मिमीपेक्षा ३२.८ मिमीने कमी आहे.

Nashik Drought Scarcity
Rainfall Forecast : यंदा जून ते ऑगस्टदरम्यान कमी पाऊस होण्याचा अंदाज

दिंडोरीत सप्टेंबरमध्ये सरासरी १३३.३ मिमीच्या तुलनेत केवळ ७०.९ मिमी (५३.२ टक्के) पाऊस झाला. हंगामातील एकूण पाऊस ७३२.८ मिमी असला, तरी मागील वर्षाच्या ७५८.७ मिमीच्या तुलनेत २५.९ मिमी घट आहे. निफाडमध्ये सप्टेंबरची सरासरी १२६.७ मिमी असताना केवळ ६०.८ मिमी (४८ टक्के) पाऊस झाला.

हंगामातील ४९८.२ मिमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक असला, तरी पिकांच्या अंतिम टप्प्यातील पावसाचा खंड चिंताजनक आहे. चांदवडमध्ये सप्टेंबरमध्ये सरासरी १२९ मिमीच्या तुलनेत केवळ ५७ मिमी (४४.१ टक्के) पाऊस झाला.

जून - सप्टेंबरची सरासरी ५१६.१ मिमी असताना, प्रत्यक्ष पाऊस ४७१.९ मिमी म्हणजेच ४४.२ मिमीची तूटी आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये हंगामी पाऊस सरासरीपेक्षा अधिक असला, तरी सप्टेंबरमध्ये २४५.६ मिमी सरासरीच्या तुलनेत केवळ १६३ मिमी (६६.४ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यातही पावसातील खंडाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे.

चांदवडची स्थिती चिंताजनक:

चांदवडची स्थिती तुलनेने अधिक चिंताजनक आहे. जून ते ऑगस्टदरम्यान ३९५.१ मिमी सरासरीच्या तुलनेत ४१४.९ मिमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये १२९ मिमी सरासरीच्या तुलनेत केवळ ५७ मिमी म्हणजेच ४४.१ टक्के पाऊस झाला. जून - सप्टेंबरची सरासरी ५१६.१ मिमी असून, प्रत्यक्ष पाऊस ४७१.९ मिमी आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ४४.२ मिमी पावसाची आणि ८.६ टक्के तूटी आहे. त्यामुळे या भागाचा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अधिक तीव्रतेने होत आहे.

जुलैचे पाणी गेले वाहून; सप्टेंबरमध्ये पिके तहानलेली:

नाशिक जिल्ह्यात जुलैमध्ये सर्वत्र झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले वाहिले, मात्र त्यातील कापाचा/पाण्याचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे त्याचा अपेक्षित जलसाठा शेतीसाठी निर्माण झाला नाही. त्यानंतर ऑगस्टमधील पावसाचा खंड आणि सप्टेंबरमधील तुटीमुळे जमिनीतील ओलावा कमी होत गेला. पिकांना दाणे भरणे, वाढ पूर्ण होणे आणि उत्पादन टिकविण्यासाठी पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला आहे.

'दुष्काळी निकषानुसार फेरआढावा घ्यावा':

जिल्ह्यात जून - सप्टेंबरसाठी सरासरी ९१५.४ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्ष पाऊस ६५२.२ मिमी म्हणजेच ७१.२ टक्के झाला आहे. त्यामुळे केवळ हंगामी एकूण पावसाचा आकडा न पाहता पावसाचे वितरण, सलग खंड, सप्टेंबरमधील तूटी आणि पिकांच्या गरजेच्या काळातील पर्जन्यमान यांचा विचार करून या पाच तालुक्यांचा दुष्काळी निकषानुसार फेरआढावा घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

धरणे काठोकाठ, तरीही टंचाईची चिंता!

जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील संभाव्य पिण्याच्या पाण्याच्या संकटाचे सावट दूर झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध असून, सप्टेंबरअखेर २४ प्रमुख व मध्यम प्रकल्पांचा सरासरी जलसाठा ९७ टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे.

अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, जास्त झालेल्या काही प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात आला. मात्र, जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील काही तालुक्यांमध्ये पावसाची अनियमितता आणि भूजल पातळीतील घट कायम असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनासमोर आहे.

नाशिक शहराची जीवनवाहिनी असलेल्या गंगापूर धरणासह या धरण समूहाचा साठा १०० टक्के झाला आहे, तर मुकणे धरण ८३.५५ टक्के भरले आहे. दारणा धरणात १०० टक्के, भावली आणि वाघाड ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

दरम्यान, धरणात समाधानकारक झालेला असला, तरी त्याचा अवाजवी वापर न करता, उपलब्ध पाण्याचा काटेकोर आणि सुनियोजित वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे धरणे भरली, आता पाणी वाचविण्याची वेळ अशी स्थिती निर्माण झाली असून, आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जलनियोजनाला वेग देण्याची गरज आहे.

जुलै - ऑगस्टचा पाऊस ठरला तारक:

जूनमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. परिणामी अनेक प्रकल्पांनी पूर्ण क्षमतेकडे वाटचाल केली. काही धरणांमधून सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्ग करावा लागला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह आगामी रब्बी हंगामासाठीही जिल्ह्याची जलस्थिती सध्या समाधानकारक मानली जात आहे.

Nashik Drought Scarcity
Nashik Ganpati Visarjan 2026: नाशिक पोलिसांचा दणका, अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढलं; एक मंडळ- एक ढोलपथकाचा नियम

मुबलक पाणी, तरीही काही भागांत टंचाई:

धरणांमध्ये मोठा साठा असला, तरी जिल्ह्यात सर्वच भागांमध्ये पावसाचे समान वितरण झाले नाही. येवला, सिन्नरसह उत्तर-पूर्व भागातील काही क्षेत्रांत पावसाची अनियमितता जाणवत आहे. काही ठिकाणी भूजल पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी मुबलक असले, तरी स्थानिक पातळीवरील पाणीटंचाईचे प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत.

आता 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर:

धरणांमध्ये समाधानकारक साठा असला, तरी उन्हाळ्याचा काळ लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवणे, सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन निश्चित करणे, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची हानी कमी करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यासाठी जलसंपदा विभागाकडून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news