भोंदूबाबाची गुगली! पेठ रोडवरील गोणीत सापडलेले सांगाडे प्लास्टिकचे

पंचवटी : एरंडवाडी येथील मंदिराजवळून ताब्यात घेतलेले प्लास्टिकचे मानवी सांगाडे. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : एरंडवाडी येथील मंदिराजवळून ताब्यात घेतलेले प्लास्टिकचे मानवी सांगाडे. (छाया : गणेश बोडके)

पंचवटी (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – पेठ रोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत मानवी कवट्या आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी अघोरी प्रथा तसेच जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या घरातून प्लास्टिकच्या कवट्या असलेली माळ व वाळलेले लिंबू हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध समूळ उच्चाटनाकरिता अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवाडी परिसरात संशयित भोंदुबाबा निलेश राजेंद्र थोरात हा काहीतरी जादुटोणा करण्याकरीता मानवी कवट्या गळयात घालून, अघोरी विद्या करून लोकांना जादूटोणा, भूत, पिशाच्चाचे प्रयोग करीत असल्याची बातमी मिळाली होती. ही माहिती पोलिस हवालदार शिंदे यांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना दिली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १४) रात्री एरंडवाडी या ठिकाणी जात कालिकामाता मंदिरातून प्रत्यक्ष मानवी कवट्या असलेली माळ व वाळलेले लिंबू मिळून आले होते. रविवारी (दि. १६) भोंदूबाबा थोरात याला ताब्यात घेतले. संशयिताविरोधात पोलिस हवालदार कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, दीपक नाईक, पोलिस नाईक संदीप मालसाणे आदींनी पार पाडली.

अर्थप्राप्तीसाठी चमत्कारांचा प्रयोग

संशयिताची कसून चौकशी करता त्याने, 'मला गळ्यात कवट्यांची माळ टाकून अलोैकिक शक्ती प्राप्त होते, असे लोकांना भासवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा दावा केला. तसेच अनिष्ट व अघोरी प्रथांद्वारे तथाकथित चमत्कारांचा प्रयोग करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करता असल्याची माहिती भोंदूबाबाने दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news