काळजी घ्या ! नाशिकमध्ये अजून दाेन दिवस उष्णतेचा दाह, ‘येलो अलर्ट’

काळजी घ्या ! नाशिकमध्ये अजून दाेन दिवस उष्णतेचा दाह, ‘येलो अलर्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – गेल्या चार दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यासाठी उष्णतेचा 'येलो अलर्ट' असणार आहे. या कालावधीत ४० अंशांच्या पलीकडे पारा स्थिर राहू शकतो.

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील चक्रावातामुळे वायव्य दिशेकडून उष्ण वाऱ्यांचा झाेत वाहत आहे. त्याचवेळी अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनमुळे दक्षिण-मध्य भारतामधील आर्द्रतेत वाढ झाली आहे. परिणामी उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा परिणाम नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दिसून येतो आहे. वातावरणातील बदलामुळे हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. नागरिक घामाघूम होत आहेत. नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पारा चाळिशीपार स्थिरावला आहे. बुधवारी (दि.२३) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शहरात करण्यात आली. वाढत्या उकाड्यामुळे घरात बसणे मुश्कील झाले असून, रात्रीच्या वेळीदेखील वाहणाऱ्या उष्म वाऱ्यांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उष्णतेची लाट कायम आहे. मालेगावच्या पाऱ्यात गुरुवारी (दि.२३) काहीअंशी घट होऊन तो ४२.६ अंशांवर स्थिरावला. तर निफाडमध्येही पारा ४१.२ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही पाऱ्यातील चढ-उतार कायम आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहील. त्यानंतर महिनाअखेरपर्यंत पाऱ्यात घसरण होत जाईल. तसेच काही भागांत मान्सूनपूर्व सरी हजेरी लावतील, असा अंदाज आहे.

बत्ती गूल, नाशिककर घामाघूम

नाशिकचा पारा एकीकडे चाळिशीपार पोहोचला असतानाच महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्यांना सहन करावा लागतो आहे. मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली तासन‌्तास विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे. तर काही भागांत विद्युत यंत्रणाच ठप्प पडत असल्याने बत्ती गूल होत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिक घामाघूम होत आहे. त्यामुळे महावितरणच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून, प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news