डोंबिवलीच्या रसायन कारखान्यात स्फोट ११ कामगारांचा होरपळून मृत्यू, ६० जखमी

डोंबिवलीच्या रसायन कारखान्यात स्फोट ११ कामगारांचा होरपळून मृत्यू, ६० जखमी
Published on
Updated on

डोंबिवली/ठाणे; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अमुदान या थिनर बनविणार्‍या केमिकल कंपनीच्या बॉयलरचे दुपारी पावणेदोनच्या सुमारास लागोपाठ चार-पाच स्फोट झाले. या शक्तिशाली स्फोटात संपूर्ण कारखाना बेचिराख झाला असून शेजारील ह्युंदाई कंपनीची शोरूमही जळून खाक झाली. शेजारील मे. मेट्रोपोलिटन कंपनी, मे. के. जी. कंपनी, मे. अंबर कंपनी आदी कंपन्यांनाही आग लागली आहे. एका मागोमाग एक कानठळ्या बसवणार्‍या स्फोटांमुळे आसपासचा तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला असून त्या परिसरातील रहिवासी इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रहिवासी भयभीत होऊन घराबाहेर पडले. या स्फोटात ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून युद्धपातळीवर स्फोटामागील कारणे शोधली जात आहेत.

या परिसराच्या बाजूलाच एक पेंट कंपनी आहे. तिथे अजूनही थोडी आग लागलेली आहे. कूलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आज (शुक्रवार) सकाळी आणखी 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्‍याची माहिती कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्‍निशमन अधिकारी दत्‍तात्रय शेळके यांनी दिली आहे.

या दुर्घटनेमुळे ८ वर्षांपूर्वी याच महिन्यात आणि याच परिसरातील १२ कामगार मृत्युमुखी पडलेल्या प्रोबेस कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले असून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधील अतिधोकायदक असलेल्या रासायनिक कंपन्या डोंबिवलीबाहेर हलविण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार केला.

जखमींवर उपचार सुरू

या दुर्घटनेतील प्रतीक वाघमारे (38), राजन घोटणकर (56), बबन देवकर (45), रुद्रांश दळवी (51), प्रवीण चव्हाण (41), मधुरा कुलकर्णी (37), हेमांगी चौके (56), किशोर विचापुरे (54) आणि अक्षता पाटील (24) या नऊ जखमींवर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत; तर अंकुश कुंभार (52), जानकी नायर (47), रवींद्रकुमार राम (32), अखिलेश मेहता (36), सोनू कुमार (21), शिरीष तळले (62), शिवराम थावळे (43), शिवम तिवारी (20), मनोज कुमार (25) इंद्रपाल भारद्वाज (34), रीना कनोजिया (27), राहुल पोटे (33), सुदर्शन मेहता (35), मनीषा पोखरकर (46), प्रिन्स गुप्ता (27), संजय कुमार महातो (24), सागर डोहळे (28), किशोर सावंत (51), रवी कुमार (21), तेजल गावित (23), विकास मेहता (35), सुजाता कानोजिया (34), सागर दास (30) आणि राम चौहान (70) या 24 जखमींवर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बाधितांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश

या स्फोटाची माहिती मिळताच तातडीने उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोंबविलीमधील अतिधोकादायक असलेल्या रासायिनक कंपन्या डोंबिवलीबाहेर हलविण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्याशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आठवडाभरात पंचनामे करून जखमी, दुर्घटनाग्रस्त, बाधितांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले असल्याचे सांगितले.

जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी : फडणवीस

स्फोटाच्या घटनेनंतर जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या चमूला पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टवर केली आहे.

अतिधोकादायक रासायनिक कंपन्या हलविणार : मुख्यमंत्री

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीच्या रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन आठ कामगार ठार झाले असून 60 पेक्षा जण अधिक जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत आणि जखमींचा उपचार खर्च सरकार करेल. तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दिली.

त्याचबरोबर डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्या तातडीने बंद करून त्यांना अन्य व्यवसाय करण्याची अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलविणे आणि राज्यातील सर्व एमआयडीसीमधील धोकादायक असलेल्या रासायनिक कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. डोंबिवलीत रेड झोनमधील केमिकल कारखाने अंबरनाथ आणि सुरक्षित स्थळी हलवण्यासंबंधी आम्ही निर्णय घेतला आहे.

या दुर्घटनास्थळाची पाहणी आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री घटनास्थळी गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगतिले.
या प्रकरणात कुणीही कुणाला वाचविण्याचे प्रयत्न करू नये, असाही गर्भित इशारा दिला आहे. अमुदान कंपनीच्या रिअ‍ॅक्टरचा भीषण स्फोट झाल्याने आजुबाजुंच्या पाच-सहा कंपन्यामधील कामगार अडकले असून त्यांना वाचविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणाले, डोंबिवलीमधील सर्व अतिधोकादायक रासायनिक कंपन्या लगेच बंद करून त्या सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व एमआयडीसीमधील अतिधोकादायक कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news