नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून, मुंबई नाका परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात महापालिकेच्या माध्यमातून क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ब्रान्झ धातूचा संयुक्त पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा उभारणीच्या ४.८४ कोटींच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. तर पुतळ्यासाठी चबुतरा उभारण्यासाठी २.४३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
देशातील आद्य समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतातील स्त्री शिक्षणाची ज्ञानगंगोत्री आणि फुले यांच्या सत्यशोधक मार्गात तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढील पिढीला मार्गदर्शन ठरावे, यासाठी शहरातील मुंबई नाका परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात फुले दाम्पत्यांचा संयुक्त पुतळा उभारण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पुतळा उभारणीसाठी १४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु प्रस्तावावरील कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या दालनात ठिय्या आंदोलनही केले होते. अखेर या पाठपुराव्याला यश लाभले असून, फुले दाम्पत्यांचा ब्रान्झ धातूचा पुतळा उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. निविदा प्रक्रियेअंती पुतळा उभारण्याचे काम पंकज वसंतराव काळे यांना देण्यात आले आहे.
देखभालीची जबाबदारी एमईटीकडे
सद्यस्थितीत सावित्रीबाई फुले चौकातील वाहतूक बेटाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मायलॉन कंपनीकडे होती. महासभेच्या ठरावानुसार या जबाबदारीतून मायलॉन कंपनीला मुक्त करण्यात आले आहे. या चौकाचे व प्रस्तावित पुतळ्याचे सामाजिक दायित्वातून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेस देण्यात आली आहे.
सर्कलचा आकार कमी करणार
पुतळा उभारण्याकरिता चबुतरा उभारण्यासाठी २.४३ कोटींच्या प्रस्तावाला स्वतंत्रपणे मंजुरी देण्यात आली आहे. पुतळा उभारतानाच पोलिस विभागाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार सर्कलचा आकारही कमी केला जाणार आहे. यामुळे या चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
येत्या २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी होत आहे. महापालिकेने संबंधित मक्तेदारास कार्यारंभ आदेश देऊन तातडीने पुतळा उभारणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. पुण्यतिथीदिनी पुतळ्याचे उद्घाटन केले जावे.
– समाधान जेजुरकर, प्रदेश सरचिटणीस, समता परिषद
हेही वाचा :