नाशिक जिल्ह्यात पावसाचे कमबॅक, दोन दिवस येलो अलर्ट | पुढारी

नाशिक जिल्ह्यात पावसाचे कमबॅक, दोन दिवस येलो अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यामध्ये पावसाने गाेकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जोरदार कमबॅक केले. शहर व परिसरात दिवसभर सरींवर सरी बरसल्या. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाचा जोर चांगला होता. तब्बल महिनाभरानंतर पावसाने पुनरागमन केल्याने जिल्हावासीय सुखावले आहे. हवामान विभागामार्फत पुढील दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये जेमतेम हजेरी लावली होती. ऑगस्टमध्ये तो चांगला बरसेल, अशी अपेक्षा असताना संपूर्ण महिना कोरडाठाक गेला. आता सप्टेंबर महिन्यात तो हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरविताना नाशिकमध्ये बुधवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून पाऊस परतला आहे.

शहर व परिसरात मध्यरात्री 1.45 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गुरुवारी (दि. ७) दिवसभर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे नाशिककरांची दैना उडाली. सायंकाळी 6.30 च्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची धांदल उडाली, तर रस्त्यावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल झाले. पावसाच्या पुनरागमनासह नाशिककरांनी कपाटात ठेवलेले रेनकोट व छत्र्या बाहेर काढल्या. शहरात सकाळी 8 पर्यंत ८.८ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बुधवारी (दि. ६) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये संततधार सुरू होती. अन्यही तालुक्यांत त्याने हजेरी लावली. सकाळनंतर त्याचा जोर काहीसा ओसरला. मात्र थोडा का होईना पाऊस झाल्याने पिकांना काहीसा आधार मिळणार असल्याने बळीराजाचा काही भार हलका झाला. दरम्यान, जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत संपलेल्या २४ तासांमध्ये सरासरी १७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच यंदाच्या हंगामात १ जूनपासून ते आजतागायत सरासरी ४२१ मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ४५ टक्के इतके आहे.

हेही वाचा :

Back to top button