पूर्व उपनगरात घाटकोपर, कुर्ला येथे दहीहंडीचा उत्साह; नेते , अभिनेत्यांची उपस्थितीसह पावसाची हजेरी | पुढारी

पूर्व उपनगरात घाटकोपर, कुर्ला येथे दहीहंडीचा उत्साह; नेते , अभिनेत्यांची उपस्थितीसह पावसाची हजेरी

घाटकोपर, पुढारी वृत्‍तसेवा : पूर्व उपनगरात दहीहंडीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कुर्ला , घाटकोपर येथे गोविंदानी या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी सर्वाधिक गाजली.

दरम्‍यान, चित्रपटातील कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच याठिकाणी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कदम यांनी दहीहंडीचे मोठ्या थाटात आयोजन केले. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अभिनेते जितेंद्र, विकी कौशल, रेमो डिसोझा, आदित्य पांचोली, साजिद खान, पद्मिनी कोल्हापुरी, शक्ती कपूर, रामदास आठवले, आशिष शेलार, किरीट सोमय्या यांनीही उपस्थिती नोंदवली. घाटकोपर एमजी रोडवर भाजप नेते प्रवीण छेडा यांच्या हस्ते दहीहंडीचेही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

कुर्ला येथील संदीप ऊटगी यांच्या मनसेच्या हंडीला ही मोठी गर्दी झाली होती.घाटकोपर पूर्व ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी आचार्य अत्रे मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. इथे माजी मंत्री जयंत पाटील यांनी हजेरी लावत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र दिवस भर पावसाची रिपरिप उपनगरात सुरु होती.यामुळे गोविंदा पथकांना आणि आयोजकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.रात्री मात्र पावसाने काही काळ उघड घेतल्याने मोठा दिलासा मिळाला.

 

Back to top button