नाशिकमध्ये ५९,२७९ जणांना श्वानदंश

file photo
file photo
Published on
Updated on

महापालिकेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम राबविली जात असूनही भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियत्रंण मिळविणे शक्य झालेले नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून, गेल्या पाच वर्षात तब्बल ५९,२७९ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. लहान मुले व महिलांना कुत्र्यांकडून लक्ष्य बनविले जात असल्याचा सर्वसाधारण समज असला तरी, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत श्वान दंश झालेल्यांमध्ये लहान मुलांपेक्षा प्रौढांची संख्या अडीच पटीने अधिक तर, महिलांच्या तुलनेत श्वानदंश झालेल्या पुरूषांचा आकडा सरासरी तिप्पट आहे.

शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून २००७ पासून कंत्राटी तत्वावर निर्बिजीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेवर गेल्या १६ वर्षांत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक भटक्या व मोकाट कुत्र्यांवर र्निबिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. कुत्र्यांचा प्रजनन दर हा शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने अधिक असल्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता आले नसल्याचे वैद्यकीय विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे श्वानदंशाचे प्रकारही वाढले आहेत. गेल्या पाच वर्षात नाशिक शहर व लगतच्या ग्रामीण भागातील तब्बल ५९,२७९ जणांना श्वानदंश झाल्याची आकडेवारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील अहवालातून समोर आली आहे. कुत्रा चावल्यास 'रेबीज'सारखा प्राणघातक आजार उद्भवू शकतो. यासाठी श्वानदंशावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षात शहर व लगतच्या ग्रामीण भागातील ५९,२७९ जणांना महापालिकेची रुग्णालये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

श्वानदंश झालेल्यांमध्ये प्रौढांचीच संख्या अधिक
भटकी व मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले व महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील गेल्या पाच वर्षातील आकडेवारीनुसार ५९,२७९ श्वानदंशाच्या घटनांमध्ये ३९,६७३ जण प्रौढ आहेत. तर १९ वर्षाखालील १९,६०५ जणांचा समावेश आहे. याचाच अर्थ लहान मुलांच्या तुलनेत श्वानदंश झालेल्यांमध्ये प्रौढांचा आकडा हा जवळपास अडीच पट आहे. विशेष म्हणजे श्वानदंश झालेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांची संख्या अधिक आहे. श्वानदंश झालेल्यांपैकी १५,७८० या स्त्रिया आहेत तर पुरूषांची संख्या ४३,४९८ इतकी आहे.

एकही मृत्यू नाही
गेल्या पाच वर्षात महापालिका हद्दीत श्वानदंशामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील अहवालातून समोर आले आहे. श्वानदंशानंतर रेबीज झाल्याची नोंदही या अहवालात नाही. श्वानदंशानंतर तातडीने उपचार, लस दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला, असा दावा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे.

गत पाच वर्षातील श्वानदंशाच्या घटना
वर्ष                                  श्वानदंश
२०१९-२०                           १४,३०८
२०२०-२१                           ९,६७२
२०२१-२२                           १२,०४१
२०२२-२३                           १६,२४३
ऑगस्ट २०२३पर्यंत                ७०१५
एकूण                               ५९,२७९

अशी आहे पाच वर्षातील आकडेवारी
* गत पाच वर्षातील एकूण श्वानदंश- ५९,२७९
* श्वानदंश झालेल्यांमध्ये १९ वर्षाखालील- १९,६०५
* श्वानदंश झालेल्यांमध्ये प्रौढांची संख्या- ३९,६७३
* श्वानदंश झालेल्यांमधील महिलांची संख्या- १५,७८०
* श्वानदंश झशलेल्यांमधील पुरूषांची संख्या- ४३,४९८

काय आहे रेबीज (Rabies)? 
प्रामुख्याने कुत्रा चालवल्याने रेबीज होतो. रेबीज हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यामध्ये दिसून येणारा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधीत करतात. बाधीत पशुधनाच्या ज्या भागात मज्जासंस्थेचे दाट जाळे अशा भागातील स्त्रावातून हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात. जसे पशुधनाच्या तोंडातून येणारी लाळ बाधीत पशुधनाच्या चावण्याने (दंश) या विषाणूचा प्रामुख्याने प्रसार होतो. हा रोग झुनॉटीक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला होतो.

श्वानदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना
मज्जा संस्थेसंबंधी लक्षणे दिसून आल्यास अशा पशुधनातील उपचार काळजीपूर्वक व संरक्षक प्रावणे(पीपीई फीट, ग्लोब्ज, मास्क, फेसशिल्ड) वापरावी. बाधीत पशुधन चावल्यास किंवा लाळेशी संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जंटच्या द्रावणाने जखम धुवुन काढावी. जखमेवर २ टक्के अॅक्वियस क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड लावावे. त्यानंतर टीक्चर आयोडीन, पोव्हीडोन आयोडीन लावावे व जखमेस पट्टी बांधू नये.

प्रतिबंधक लसिकरण
श्वानदंश किंवा रेबीज प्रतिबंधासाठी श्वानदंशापुर्वी व श्वानदंशानंतर अशा दोन प्रकारे लसिकरण करण्यात येते. श्वानदंशापुर्वी करावयाच्या लसिकरण पध्दतीत सर्व साधारणपणे प्रतिबंधात्मक लसीची तीन इंजेक्शने वेळापत्रक- शुन्य दिवस, सातव्या दिवस आणि २१ किंवा २८ व्या दिवशी. बुस्टर लसीकरण प्राथमिक लशीकरणानंतर एका वर्षाने. तथापि लस उत्पादकांच्या सूचनांनुसार लसीकरण वेळापत्रक व लस मात्राची संख्या याचे तंतोतंत पालन करावे. श्वानदंशानंतर करावयाच्या लसिकरण पध्दतीत श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण न केलेले पशुधन तसेच प्रतिबंधात्मक लसिकरानानंतर प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधी उलटून गेला असेल अशा पशुधनाची लसीची पाच इंजेक्शन द्यावीत. वेळापत्रक याप्रमाणे: शुन्य दिवस, तिसरा दिवस, सातवा दिवस, १४ आणि २८ दिवशी. श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले व प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधीत श्वानदंश झालेला असल्यास अशा पशुधनास लसीची दोन इंजेक्शने द्यावी लागतात.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news