नवजात तार्‍याला फुटली ‘मांजराची शेपूट’! | पुढारी

नवजात तार्‍याला फुटली ‘मांजराची शेपूट’!

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अफाट पसार्‍यात अनेक थक्क करणारी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने एका नवजात तार्‍याची प्रतिमा टिपून घेतली आहे. विशेष म्हणजे या तार्‍यापासून शेपटीसारखा भाग बाहेर आलेला आहे. मांजराच्या शेपटीसारखा दिसणारा हा भाग वायू आणि धुळीचा आहे. या तार्‍याला अशी शेपूट कशी व का निर्माण झाली हे अद्याप समजलेले नाही.

या तार्‍याचे नाव आहे ‘बेटा पिक्टोरिस’. आपल्या सौरमालिकेपासून 63 प्रकाशवर्ष अंतरावर हा सूर्यासारखा तारा आहे. आपल्या सौरमालिकेच्या सर्वात जवळच्या शेजार्‍यांमध्ये त्याचा समावेश होतो. सूर्यापासून सर्वात जवळचा तारा आहे ‘प्रॉक्झिमा सेंटौरी’. हा तारा केवळ 4 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ‘बेटा पिक्टोरिस’ हा तारा 1984 मध्ये शोधण्यात आला होता. त्यावेळेपासूनच त्याच्यावर अनेक वेळा संशोधन करण्यात आले आहे. गेल्या वेळेच्या संशोधनातून स्पष्ट झाले होते की हा तारा 2 कोटी वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. हे वय एखाद्या तार्‍याच्या हिशेबाने अतिशय कमी मानले जाते. अन्य सर्व नवजात तार्‍यांप्रमाणेच हा ताराही अद्याप धूळ आणि वायूने वेढलेला आहे. त्याला ‘प्रोटोप्लॅनेटरी डिस्क’ असे म्हटले जाते.

कालौघात ही धूळ आणि वायू थंड होऊन एकमेकांना चिकटतात व त्यामधून ग्रह, चंद्र आणि लघुग्रह यांची निर्मिती होते. आपली सौरमालिकाही अशीच तयार झाली होती. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपलेल्या काही नव्या छायाचित्रांमध्ये या तार्‍याला ‘मांजराची शेपूट’ असल्याचे दिसले आहे. ‘अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’च्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ‘नासा’च्या गॉडर्ड स्पेस फ्लाईट सेंटरच्या ख्रिस्तोफर स्टार्क यांनी सांगितले की अशी शेपटीसारखी रचना ही एक असामान्य बाब आहे. त्यावरून असे दिसते की हा तारा बनण्याची प्रक्रिया अनुमानापेक्षा अधिक वेगवान आहे. ही शेपूट अधिक घन स्वरूपातील नाही. तिचे वस्तुमान आपल्या सौरमालिकेतील काही मोठ्या आकाराच्या लघुग्रहांइतके असू शकते. ही शेपूट 16 अब्ज किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे.

Back to top button