Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी

Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वरुणराजाची कृपावृष्टी, आदिवासी बांधवांनी सादर केलेले नृत्य आणि भाविकांनी 'श्री चक्रधरस्वामी महाराज की जय; गोपाल भगवान की जय'च्या केलेल्या जयघोषाने अवघी नाशिकनगरी दुमदुमून गेली. यानिमित्ताने काढण्यात आलेली शोभायात्रा पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. तत्पूर्वी संमेलनस्थळी महानुभावपंथीयांतर्फे विविध प्रकारच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. या मागण्यांबाबत ना. फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.

अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि.30) संमेलन नगरी ते गोदाघाट अशी मिरवणूक काढण्यात आली. घोडागाडीत विराजमान साधू-महंत आणि जोडीला देशभरातून आलेल्या भाविकांचा क्षणाक्षणाला वाढत जाणार्‍या उत्साहामुळे वातावरण भक्तिमय झाले. दरम्यान, त्यापूर्वी संमेलनस्थळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत धर्मसभा पार पडली. यावेळी कारंजेकर बाबा यांनी विचार व्यक्त करताना गेल्या अडीच वर्षांत मराठी भाषा विद्यापीठ आणि ऋद्धपूर परिसर सुशोभीकरणासाठी कोणतीही हालचाल झाली नसल्याची खंत व्यक्त केली. महानुभावपंथीयांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करताना चुकून त्यांनी ना. फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून नामोल्लेख केला. पण, चूक लक्षात येताच साधू-महंताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून, 2024 मध्ये ते घडू शकते, अशी पुष्टी जोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच ऋद्धपूरला दर्शनासाठी येणार असल्याची माहिती कारंजेकर बाबा यांनी दिली.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मनोगतात जनतेच्या सेवेला श्री चक्रधरस्वामी यांनी महत्त्व दिले. तसेच जगाला समानतेचा भाव त्यांनी शिकवल्याचे त्यांनी सांगितले. आ. एकनाथ खडसे यांनी महानुभाव पंथामुळे आज मी इथवर पोहोचल्याची भावना व्यक्त केली. 1990 साली पहिल्यांदा निवडणूक लढवीत असताना महानुभाव पाठीशी उभे राहिल्याने मी निवडून आल्याची आठवण त्यांनी सांगितली. भगवान चक्रधर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. मात्र, 800 वर्षांनंतरही समाजात महिलांचा आदर केला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, विद्धंस बाबा, गोपालदास बाबा, मराठे बाबा आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. चिरडे बाबा यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश घुगे यांनी आभार मानले. यावेळी सप्तग्रंथ व चक्रधरस्वामी आत्मरूप चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

संमेलनातील मागण्या व ठराव
भरवस येथील चक्रधरस्वामींची जन्मभूमी दर्शनासाठी मुक्त करावी.
श्री चक्रधरस्वामी जन्मदिनी सार्वजनिक सुटी घोषित करावी.
श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दरवर्षी शासकीय महापूजा करण्यात यावी.
स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास करावा.
महानुभाव संत, भाविकांसाठी गावात दफन विधीसाठी जागा मिळावी.
श्रीक्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठ उभारावे.
श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी वर्ष शासनदरबारी साजरे करावे.
गोरक्षण घाट येथील रस्ता अतिक्रमणमुक्त करावा.

महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख
दिनकर पाटील यांनी प्रास्ताविकात ना. गिरीश महाजन यांचा नामोल्लेख पालकमंत्री म्हणून केला. पाटील यांचा हाच धागा पकडून प्रत्येक मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात ना. महाजन यांचा नाशिकचे पालकमंत्री व संकटमोचक म्हणून उल्लेख केला. मान्यवरांच्या या उल्लेखामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वत: महाजन हे काही काळासाठी अचंबित झाले.

महानुभाव पंथ तुमच्या पाठीशी : चिरडे बाबा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत शहराचा विकास केला. आज महानुभाव पंथीयांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला दत्तक घेत असून, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन चिरडे बाबा यांनी दिले. तसेच आमचा पंथ हा तुमच्या सदैव पाठीशी उभा राहील, असे सांगताना आम्ही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news